‘घर तिथे रोजगार’ अभियानासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा !

डॉ. सुनीता मोडक यांचे आवाहन
कुडाळमध्ये महिलांसाठी उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षणाला प्रारंभ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘घर तिथे रोजगार’ अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावातील रणरागिणींनी पुढाकार घेऊन ही मोहीम हाती घ्यावी. भविष्यात ही चळवळ राज्यभर पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिकच्या अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक यांनी केले.
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक आणि आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास अभियानांतर्गत महिलांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन कुडाळ येथील दैवज्ञ समाज भवन, शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आज डॉ. सुनीता मोडक यांच्या हस्ते झाले. हे प्रशिक्षण शिबिर आज आणि उद्या असे दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी फाइन आर्टिस्ट व क्राफ्ट ट्रेनर नंदिनी रामचंदानी, आश्रय प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव गोरे, मणिकर्णिका संस्थेच्या अध्यक्षा उन्मेषा दाभोलकर, सतीश पाथरुड, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे विवेक पंडित, रमाकांत नाईक, ज्येष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, उमेश दाभोलकर, स्वाती पेडणेकर, मृणाल सावंत, कीर्ती पाटील, पूजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मोडक म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण होण्याबरोबरच त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी कल्याणी संस्था आणि आश्रय प्रतिष्ठान संयुक्तपणे काम करत आहेत. सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येतात; मात्र त्यांवर मात करून यशस्वी होणारेच स्पर्धेत टिकतात. चांगले काम करताना यश मिळण्यास वेळ लागतो; पण असे यश दीर्घकाळ टिकते. ‘गाव तिथे रोजगार’ या संकल्पनेपुढे जाऊन ‘घर तिथे रोजगार’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यात महिलांनी क्लस्टरच्या माध्यमातूनही उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला असून येथे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कुडाळमधील पुरुषांची वटपौर्णिमा आणि दुर्गादौड हे उपक्रम राज्यासाठी आदर्शवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मणिकर्णिका संस्थेच्या अध्यक्षा उन्मेषा दाभोलकर म्हणाल्या की, महिला आपल्या कौशल्याच्या बळावर शिवणकामासारख्या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळवू शकते. सन्मान आणि आत्मनिर्भरता हाच तिचा खरा शृंगार आहे. प्रत्येक स्त्रीने स्वयं सिद्ध होऊन स्वयंउद्योजिका बनावे, हे स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. सुनीता मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण प्रयत्नशील आहेत.
कापड रंगकामासह विविध वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण
या प्रशिक्षण शिबिरात नंदिनी रामचंदानी यांनी फॅब्रिक पेंटिंगचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. कापडासाठी योग्य रंगांची निवड, ब्रशचा वापर, चित्रकलेची विविध तंत्रे, फुलांची पारंपरिक व आधुनिक डिझाइन्स, स्टेन्सिल तंत्र, रंगांचे मिश्रण, शेडिंग तसेच कापडावरील रंग दीर्घकाळ टिकविण्याच्या पद्धती यांची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय रेझिन ट्रे, कोस्टर, कीचेन, फोटो फ्रेम, आरती थाळी, विविध प्रकारच्या मेणबत्त्या, सुगंधी जार, पिलो बॉक्स, स्लाइडिंग बॉक्स, पेपर बॉक्स, ड्रॉवर बॉक्स, षटकोनी बॉक्स, विंडो बॉक्स, कागदी पिशव्या आणि लिफाफे तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. या उपक्रमातून महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्यविकासावर भर देण्यात येत आहे.






