कुडाळ तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा

नारूरमध्ये धर्मशाळेचे छप्पर उडाले, नेरूरमध्ये भातपीक जमीनदोस्त

ऐन कापणीच्या वेळी नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल

कुडाळ तालुक्यात मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान केले. सुमारे पाऊण तास सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचा नारूर आणि नेरूर परिसराला मोठा फटका बसला. नारूर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरातील धर्मशाळेचे छप्पर उडून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले, तर नेरूर परिसरातील काढणीला आलेले भातपीक भुईसपाट झाले.
नारूर येथील महालक्ष्मी मंदिराशेजारी असलेल्या धर्मशाळेच्या इमारतीचे छप्पर वादळी वाऱ्यामुळे भिंतीपासून उखडून एका बाजूला सरकले. या घटनेत छतासह इमारतीतील पंखे आणि विद्युत दिव्यांचेही नुकसान झाले. या नुकसानीचा अंदाज सुमारे एक लाख रुपये असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांनी दिली.
दरम्यान, नारूर परिसरात सुरेश पारकर यांच्या घरावर सुपारीचे झाड कोसळल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले. तसेच सुरेश भागवत यांचेही अंशतः नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे, नेरूर परिसरात वादळी वाऱ्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी भातपीक कापणीच्या अवस्थेत असताना सुमारे पाऊण तास वाहिलेल्या जोरदार वाऱ्यामुळे उभे पीक जमिनीवर आडवे झाले. ऐन काढणीच्या तोंडावर पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घरांचे, धर्मशाळेचे आणि भातशेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!