पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वाहन चालक चाचणी मार्गाचे भूमिपूजन

सिंधुदुर्गच्या परिवहन क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल
चाचणी प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्गनगरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मान्यताप्राप्त वाहन चालक चाचणी मार्गाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ बुधवारी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या चाचणी मार्गामुळे वाहनचालकांच्या चाचण्या अधिक सुव्यवस्थित, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने घेण्यास मदत होणार आहे. वाहन चालक चाचणी प्रक्रियेला अधिक शिस्तबद्ध स्वरूप देण्यासह जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्यातील वाहन चालक चाचणी प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी या चाचणी मार्गाचा उपयोग होणार आहे. परिवहन क्षेत्रातील सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे.
या भूमिपूजन समारंभाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे विजय काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई वालावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मान्यताप्राप्त वाहन चालक चाचणी मार्ग (Accredited Driving Test Track – ADTT)
या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहन चालक परवान्यासाठीच्या चाचणी प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. स्वयंचलित वाहन चालक चाचणी मार्गावर वाहन चालविण्याच्या कौशल्यांचे निर्धारित निकषांनुसार वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे चाचणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होऊन एकसमान निकषांवर आधारित परीक्षणास प्रोत्साहन मिळेल.
सक्षम, प्रशिक्षित व वाहतूक नियमांचे पालन करणारे वाहनचालक घडविणे आणि रस्ते सुरक्षेला बळकटी देणे या दृष्टीने ADTT प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.






