वेताळ बांबर्डेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा

जलसंधारणाचा दिला संदेश

स्काऊट-गाईड व एनसीसी पथकाचा सहभाग

संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासोबतच जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या स्काऊट-गाईड पथक आणि एनसीसी युनिटच्या वतीने वेताळ बांबर्डे येथील वाघभाटलेवाडी परिसरात वनराई बंधारा बांधण्यात आला. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत हा बंधारा उभारण्यात आला.
या उपक्रमाला कुडाळ व मालवणच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे, कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून ओहोळावर वनराई बंधारा बांधत जलसंधारणाचा संदेश दिला.
प्रशालेच्या महाराणा प्रताप स्काऊट पथकातील भाग्य सेठ, कार्तिक सावंत, दिशात सावंत, आरुष पटवारी आणि देवांश चौहान यांनी स्काऊटमास्तर रोहिदास राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. राणी लक्ष्मीबाई गाईड कंपनीतील स्वरा सापळे, मुग्धा शिरसाट, आध्या गावडे, आराध्या मागाडे आणि रिया गजराज यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रशालेच्या ५८ महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी पथकातील वेणुगोपाल, वेणूमाधव, भार्गवी सडवेलकर, वेदांत शृंगारे, एलन फर्नांडिस, सौम्या नाईक, बापूराव राणे, अदनान शाहगोदड, सोहम गजराज आणि आकाश बांदीवडार यांनी मार्गदर्शक विश्वजीत डांगमोडेकर यांच्या समवेत श्रमदान केले.
वनराई बंधारा बांधण्यासोबतच दोन्ही पथकांनी परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता मोहीमही राबवली. जलसंधारण आणि परिसर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, प्रशालेच्या प्राचार्या चैताली बांदेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी कामत आणि शिक्षकवृंद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

error: Content is protected !!