‘सुहासदादांनी मालवणी रंगभूमीला महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळवून दिले’

कणकवलीत सुहास वरुणकर यांना भावपूर्ण आदरांजल
आठवणींनी रंगकर्मी आणि सुहासप्रेमी गहिवरले
आपल्या नाट्यसंहितांना सुहास वरुणकर यांनी महाराष्ट्रात नाव आणि उंची मिळवून दिली. मालवणी भाषेतील नाटकांना राज्यस्तरावर प्रतिष्ठा मिळवून देतानाच त्यांनी कोकणच्या मातीचा सुगंध महाराष्ट्रभर पोहोचविला, असे भावपूर्ण प्रतिपादन रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि नाट्यकर्मी विजय चव्हाण यांनी केले.
कणकवलीतील सांस्कृतिक चळवळीचा अविभाज्य भाग असलेले कलाकार, पार्श्वसंगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आणि दिग्दर्शक सुहास वरुणकर यांच्या अकाली निधनाने सिंधुदुर्गच्या नाट्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कणकवलीतील विविध नाट्यसंस्था, जिल्ह्यातील रंगकर्मी आणि सुहासप्रेमी यांच्या वतीने कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुहासदादांच्या आठवणींनी संपूर्ण सभागृह भावुक झाले.
शोकसभेच्या प्रारंभी कै. सुहास वरुणकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
‘सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी’
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सुहासदादांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या जाण्याने सिंधुदुर्गच्या नाट्यचळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. कणकवलीच्या सांस्कृतिक विश्वात सुहास वरुणकर यांचे योगदान मोलाचे होते. त्यांच्या अनुपस्थितीची उणीव प्रत्येक सांस्कृतिक उपक्रमात जाणवत राहील, असे ते म्हणाले.
विजय चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, नाट्यलेखनासाठी सुहास यांच्या पत्नी विनिता वहिनी यांनी प्रोत्साहन दिले; मात्र आपल्या नाट्यसंहितांना महाराष्ट्रात नाव आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात सुहासदादांचा मोठा वाटा होता. ‘गावय’, ‘भाविण’, ‘शबय’ आणि ‘झम्पय’ या नाटकांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून देताना त्यांनी मालवणी मातीतील विषय आणि मालवणी भाषेचा गोडवा सर्वदूर पोहोचविला. जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीत निरपेक्ष योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची योग्य दखल घेतली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘सुहाससारखा नाट्यवेडा होणे नाही’
सुहासदादांचे बालपणीचे मित्र अभय खडपकर यांनी बागेश्रीपासून सुरू झालेला त्यांचा रंगमंचीय प्रवास अक्षरसिंधू परिवारात अधिक बहरल्याच्या आठवणी सांगितल्या. सुहाससारखा नाट्यवेडा होणे नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली.
प्रा. हरी भिसे यांनी कणकवली महाविद्यालयाला सुहास वरुणकर यांनी दोन वेळा सुवर्णपदक मिळवून दिल्याची आठवण सांगितली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे शरद सावंत यांनी ‘साठा उत्तराची कहाणी’ या नाटकाच्या वेळी सुहासदादांनी ऐनवेळी स्वीकारलेली जबाबदारी आणि ती यशस्वीपणे पार पाडल्याचा प्रसंग सांगितला. सुहासदादा हे आपले रंगभूमीवरील गुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘धयकालो’मधील प्रवेशातून अनोखी आदरांजली
सुहास वरुणकर हे अलीकडेच अक्षरसिंधू निर्मित आणि विजय चव्हाण लिखित बहुचर्चित ‘धयकालो’ या नाटकाच्या तालमी घेत होते. या नाटकातील सुहासदादांनी बसविलेला एक सहजसुंदर प्रवेश रोहित राणे आणि सिद्धेश म्हसकर या कलाकारांनी उपस्थितांसमोर सादर केला. या सादरीकरणातून त्यांनी आपल्या लाडक्या दिग्दर्शकाला अनोखी आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी अनेकांच्या भावना अनावर झाल्या.
मान्यवरांकडून आठवणींना उजाळा
या वेळी कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अनिल डेगवेकर, डॉ. विद्याधर तायशेटे, कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. महालिंगे, शिंपी समाजाचे राजू वर्णे, ज्येष्ठ रंगकर्मी राजेंद्र कदम, मालवणच्या अभिनेत्री सुजाता शेलटकर, राजन भोसले, अक्षरसिंधूचे अध्यक्ष संजय राणे, प्रा. शेखर गवस, प्रा. मिलिंद गुरव, यंगस्टारचे अण्णा कोदे, संजय मालांडकर, महानंद चव्हाण आदी मान्यवरांनी सुहासदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीसखाराम सकपाळ, बापू खरात, रोटरी क्लबचे संतोष कांबळे, कणकवली कॉलेज सांस्कृतिक विभागाचे विजय सावंत, अक्षरसिंधूचे सचिव मयूर चव्हाण, विवेक वाळके, किशोर कदम, प्रमोद तांबे, संतोष कदम, सुदिन तांबे, पूजा राणे, पूनम सावंत, हर्षदा बागायतकर, कीर्ती गुरव, अजय पडवळ, सत्येंद्र जाधव, ॲड. नारायण देसाई, राजेश कदम, राजा राजाध्यक्ष, उमेश वाळके, निलेश पवार, मनोज मेस्त्री, मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे कोकण समन्वयक प्रा. आशिष नाईक यांच्यासह जिल्ह्यातील अनेक रंगकर्मी, सुहासप्रेमी आणि कणकवली महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू न शकलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी दीपक परब, चंदू शिरसाठ, ऋषी देसाई, शाम नाडकर्णी, केदार देसाई, अभय नेवगी, कल्पना बांदेकर, संभाजी सावंत, रजनीश राणे, भालचंद्र कुबल, कुमार नाडकर्णी, रमेश नार्वेकर, बाळू खामकर आणि पप्पी कवठणकर यांनी शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली अर्पण केली. सुहास वरुणकर यांच्या कन्या दुर्गेशा यांच्यासह कुटुंबीयही या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.






