ग्राहकांची प्रगती हेच बँकेचे यश – डॉ. स्मिता सुरवसे

बँक ऑफ महाराष्ट्रचा कुडाळमध्ये ग्राहक मेळावा

विविध कर्ज योजनांची माहिती

‘एक परिवार, एक बँक’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते जोपासत केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. स्मिता सुरवसे यांनी केले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुडाळ ब्लॉकअंतर्गत कुडाळ, कडावल, पाटपरुळे, ओरोस, कट्टा, मालवण, आचरा आणि कसाल या आठ शाखांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक मेळावा तसेच लाभार्थी ग्राहकांना कर्ज मंजुरीपत्र वाटप कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी हॉटेल लेमनग्रासच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सौ. सुरवसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी उद्योजक राकेश म्हाडदळकर, अभिजीत जैतापकर, बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी झोनचे अधिकारी संतोषकुमार, श्रीराम गुप्ता, मानसी जोशी, कुडाळ शाखाधिकारी अविनाश सुतार, ओरोस शाखाधिकारी अविनाश साळोखे, मालवण शाखाधिकारी बैजनाथ गुप्ता, पाटपरुळे शाखाधिकारी रोहन खरे, आचरा शाखाधिकारी राजा पोईपकर, कडावल शाखाधिकारी कालीचरण सोनवणे, कट्टा शाखाधिकारी स्वप्निल गायकवाड, कसाल शाखाधिकारी अजयकुमार यांच्यासह आठही शाखांमधील अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुरवसे म्हणाल्या की, बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. बँकेच्या विविध योजनांचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीपासून सावध करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध बँकिंग योजनांची माहिती देण्यासाठी बँकेने महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर आयोजित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
झोनल अधिकारी संतोषकुमार यांनी बँकेच्या शैक्षणिक, व्यावसायिक व कृषी कर्जांसह कार लोन आणि होम लोनच्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांमध्ये तुलनेने कमी व्याजदर असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कुडाळ शाखाधिकारी अविनाश सुतार यांनी ग्राहकांशी संवाद अधिक दृढ व्हावा आणि त्यांना बँकेच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, हा ग्राहक मेळाव्यामागील उद्देश असल्याचे सांगितले. ग्राहकांची प्रगती हेच आमचे यश असून, ग्राहकांशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
अविनाश साळोखे यांनी सुकन्या समृद्धी योजनेची, तर स्वप्नील गायकवाड यांनी कार लोन, गोल्ड लोन व व्यावसायिक कर्ज योजनांची माहिती दिली. श्रीराम गुप्ता यांनीही बँकेच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्राहकांना घर, वाहन, शिक्षण व व्यवसायासाठी मंजूर झालेल्या कर्जांची मंजुरीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेच्या हेड कॅशियर मानसी जोशी यांनी केले, तर आभार कालीचरण सोनवणे यांनी मानले.

error: Content is protected !!