मुंबईतील मोठ्या रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी आरोग्य कॉरिडॉर तयार करा!

आमदार प्रमोद जठार यांची राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे मागणी
जनतेच्या या संवेदनशील प्रश्नी लवकरच कार्यवाही करण्याची मंत्र्यांची ग्वाही
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून केईएम, टाटा, वाडिया, महात्मा गांधी मेमोरियल, आणि कामा यांसारख्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण गंभीर आजारांवर उपचारासाठी येतात. मात्र, उपचारादरम्यान रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना राहण्यासाठी कोणतीही परवडणारी व्यवस्था नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने उघड्यावर किंवा पदपथावर राहावे लागते. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. हे विदारक चित्र कायमचे बदलण्यासाठी आरोग्य कॉरिडॉर” विकसित करण्याची मागणी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोईर यांच्याकडे केली आहे. मुंबईतील प्रमुख रुग्णालयांच्या परिसरात “आरोग्य कॉरिडॉर” विकसित करण्याची आग्रही मागणी मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान केली आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी म्हाडा, मनपा, गृहनिर्माण विभाग आणि संबंधित रुग्णालयांची लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती मी केली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून गरीब व गरजू कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री श्री भोयर यांनी दिल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली. यावेळी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मा. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मा. मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ मा. मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ मा. उपआयुक्त (आरोग्य), बृहन्मुंबई महानगरपालिका आदी उपस्थित होते.






