दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी जलसाक्षरता महत्त्वाची – अॅड. नकुल पार्सेकर

सात कलमी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून दुष्काळाच्या तीव्रतेत घट शक्य
यंदा महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता असून, आगामी काळात पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागू शकतो. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी जलसाक्षरता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासन आपल्या परीने विविध उपाययोजना करत असले, तरी त्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, सत्ताधारी, सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेने एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करणे आवश्यक आहे. यासाठी सात कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यास संभाव्य दुष्काळाच्या झळांची तीव्रता कमी करून नागरिकांना दिलासा देता येईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमांतर्गत ‘गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लहान धरणे आणि पाझर तलावांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये पसरविल्यास जलसाठ्यांची क्षमता वाढण्याबरोबरच जमिनीची सुपीकताही सुधारण्यास मदत होईल.
तसेच, ‘माथा ते पायथा’ या तत्त्वानुसार मोठ्या प्रमाणावर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घेणे गरजेचे आहे. यामध्ये सलग समतल चर, बंधारे आणि नाला खोलीकरण यांसारख्या जलसंधारणाच्या कामांना गती दिली पाहिजे. भूजल पातळीतील घट रोखण्यासाठी अतिभूजल उपशावर नियंत्रण ठेवून भूजल नियमन कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आणि ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक बोअरवेल खोदण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली. कालव्यांमधून होणारे पाण्याचे बाष्पीभवन आणि गळती रोखण्यासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा अवलंब करण्यावरही त्यांनी भर दिला.
हवामानातील बदलांचा विचार करून शेतकऱ्यांना वेळेवर पीक नियोजन करता यावे, यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी कृषी मेळावे आयोजित करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
स्थानिक नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन पाणी वापर संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. सामूहिक प्रयत्न आणि नियोजनबद्ध जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून संभाव्य दुष्काळाचा प्रभावीपणे मुकाबला करता येईल, असा विश्वास अॅड. नकुल पार्सेकर यांनी व्यक्त केला आहे.






