जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड देत दुष्काळावर मात करूया

हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान करत जनतेला आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली पालकमित्र ची संकल्पना

जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत आगामी काळात दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीला भेडसावू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन चांगल्या प्रकारे काम करीत असून, नागरिकांनीही या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा बांधकामाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी स्वतः श्रमदान करीत बंधारा बांधकामात सहभाग घेतला. जिल्ह्यात लोकसहभागातून १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी कणकवली तालुक्यात २ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही श्रमदानात सहभाग घेतला.

वनराई बंधारे बांधताना कामाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामसेवक आणि पालकमित्रांनी बंधाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता तपासावी. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी गुणवत्ता तपासणी व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र टीम नेमण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री राणे यांनी यावेळी दिल्या. केवळ बंधारे बांधणे नव्हे, तर त्यांची योग्य पद्धतीने निर्मिती होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ जलसाठा वाढविण्यासाठी झाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

जिल्ह्यात प्रथमच निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे स्वरूप भीषण आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, उपलब्ध पाणीसाठ्याचे संवर्धन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळणे यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज आहे. येणाऱ्या कोणत्याही पिढीला दुष्काळाचे संकट भेडसावू नये, या उद्देशाने ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संकल्पित केलेली ‘पालकमित्र’ संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार

जलसंधारणाच्या कामांना गावपातळीवर तांत्रिक मार्गदर्शन आणि समन्वय मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संकल्पित केलेली ‘पालकमित्र’ संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पालकमित्र गावपातळीवर संबंधित यंत्रणा व ग्रामस्थांमध्ये समन्वय साधून वनराई बंधारे व जलतारा निर्मितीच्या कामांना गती देण्याचे काम करणार आहेत. यासोबतच ‘सिंधु पाहणी’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वनराई बंधारे व जलतारा यांच्या कामांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जलसंधारणाची ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी लोकसहभागाची जोड द्यावी. प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतल्यास जिल्ह्याची जलसुरक्षा अधिक मजबूत होईल, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, प्रांत जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच आनंद ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!