प्रसंगी नियम बाजूला ठेवून लोकांना पाणी द्या – आमदार निलेश राणे

कुडाळच्या १८८ वाड्यांसाठी ३.७७ कोटींचा पाणीटंचाई आराखडा

आपला जिल्हा हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये आहे. त्यामुळे नियम, निकष थोडे बाजूला ठेवून लोकांना पाणी कसं मिळेल याचा विचार करा, अशा स्पष्ट सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पं स कुडाळच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये आज कुडाळ तालुक्याची पाणी टंचाई आराखडा बैठक झाली त्या बैठकीत ते बोलत होते. वर्ग दोनच्या जमिनीबाबत पाणी टंचाईच्या काळात बक्षीसपत्राची अट शिथिल करून संमती पत्रकाचा वापर करा अशी महत्वाची सूचना त्यानी प्रशासनाला केली. यावेळी कुडाळ तालुक्यासाठी ३.७७ कोटी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा बनविण्यात आला असून त्यामध्ये १८८ वाड्यांचा समावेश करण्यात आला असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पाणी टंचाई आराखडा बैठकीला जि प उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, उप सभापती सीताराम तेली, प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार सचिन पाटील, गट विकास अधिकरी श्री. हिर्लेकर, ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी श्री. गवस व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला मागील सभेचे चर्चा करण्यात आली. गेल्या वेळचा आराखडा ५९ लाखांचा होता, पण यावेळची दुष्काळी परिस्थिती विचारात घेता पाणीसंभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ३ कोटी ७७ लाख रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. इतिवृत्त वाचनाच्या वेळी अनेक मुद्द्यांवर आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तीच तीच माहिती प्रत्येक वेळी देऊ नका. यावेळची परिस्थती गंभीर आहे. त्याचा विचार करून उत्तरे द्या आणि कामे अशा स्पष्ट सूचना त्यानी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा टँकर मुक्त जिल्हा आहे. त्यामुळे टँकरची गरज भासू नये असे गेल्या पाणी टंचाई आराखडा सभेत ठरविण्यात आले होते. पण यावेळी परिस्थिती गंभीर आहे. टँकरची गरज भासणार आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून टँकर पुरवठादारांशी संपर्क साधण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. पाण्याचे सोर्स सुद्धा त्यानीच शोधयांच्या सूचना टँकरवाल्याना देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.
पाणी हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात मिळाले पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली. लोकांना त्रास न होता त्यांना जास्तीत जास्त मदत प्रशासनाकडून झाली पाहिजे. वर्ग २ जमिनीबाबत पाणी टंचाईच्या काळात बक्षीसपत्राची अट शिथिल करण्याची सूचना त्यांनी महसूल विभागाला केली.
येत्या नागपूर अधिवेशनात देखील शासनाकडे आम्ही अधिकची मागणी करणार आहोतच. पण प्रशासनाने गंभीरपणे काम करावे. वेळप्रसंगी अटी, शर्थी नियम बाजूला ठेवून लोकांसाठी काम करावे असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील पाण्याची परिस्थिती आणि आवश्यक उपाययोजना याबाबत सूचना केल्या. त्यावर सभागृहात चर्चा झाली. आमदार निलेश राणे यांनी त्यावर योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या.
जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी गावात स्वयंस्फूर्तीने ३० बंधारे बांधायचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचे कामसुद्धा सुरु झाले. त्याचे आमदार निलेश राणे यांनी विशेष कौतुक करून हा आदर्श प्रत्येकाने ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जि प सदस्य दीपक नारकर, रुपेश कानडे, दीपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील, राजन परब, तसेच पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!