आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळेच गणेश घाटाला निधी !

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांचा माजी आमदारांवर पलटवार

फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट !

गणेश घाटाच्या कामाची पाहणी करून त्याचे श्रेय घेण्याचा सुरू असलेला प्रयत्न म्हणजे “काम आम्ही केले नसले तरी श्रेय मात्र आम्हालाच मिळावे,” अशा मानसिकतेचा प्रकार असल्याची टीका कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केली आहे. गणेश घाटाचे काम मंजूर असणे आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे या दोन वेगळ्या गोष्टी असून, केवळ मंजुरीचे कागद दाखवून विकासकामे पूर्ण होत नसल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
प्रसिद्धी पत्रकात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर म्हणतातकी, गणेश घाटाचे काम निधीअभावी काही काळ रखडले होते. आमदार नीलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या कामासाठी आवश्यक निधी नगरपंचायतीला उपलब्ध झाला आणि त्यानंतर कामाला गती मिळाली. गेल्या सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष म्हणून स्वतः या कामावर सातत्याने लक्ष ठेवून संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला, अडचणी दूर केल्या आणि काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला. एका दिवसाच्या स्थळ पाहणीने गणेश घाट उभा राहत नाही. त्यासाठी सातत्याने काम करावे लागते आणि हे कुडाळची सुज्ञ जनता जाणते, असेही त्यांनी नमूद केले.
गणेश घाटाचे काम आता अंतिम टप्प्यात असताना अचानक स्थळ पाहणी करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष काम कोणी केले आणि निधी कोणी उपलब्ध करून दिला, हे कुडाळकरांच्या डोळ्यांसमोर आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मागील दहा वर्षे सत्तेत असतानाही माजी आमदारांना कुडाळ शहरासाठी भरीव विकासकामे करता आली नाहीत. आता स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी असे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही नगराध्यक्षांनी केला. सत्तेत असताना अनेक आश्वासने देण्यात आली; मात्र त्यातील बहुतांश पूर्ण झाली नाहीत. कुडाळच्या जनतेने विकासाची जबाबदारी आमदार नीलेश राणे यांच्या हाती सोपवली असून त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली नगरपंचायतीची टीम आणि सर्व नगरसेवक विकासकामे प्रभावीपणे राबवत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
गणेश घाटाचे डिझाइन साधे, आकर्षक आणि कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारे असून काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कुडाळकरांनी आमदार नीलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जो विश्वास व्यक्त केला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. श्रेयासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष विकासासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. २१ व्या शतकातील आधुनिक, सुंदर आणि विकसित कुडाळ घडवण्याचा दिलेला शब्द आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास नगराध्यक्षांनी शेवटी व्यक्त केला.

error: Content is protected !!