विकास संस्थांच्या सभासदांसाठी दिलासादायक निर्णय

सर्व कर्जांवर १% व्याज सवलत, कर्ज मंजुरी अवघ्या ७ दिवसांत

कुडाळात ३४ प्राथमिक विकास संस्थांचा गौरव

प्राथमिक विकास सहकारी संस्थांच्या सभासदांना सर्व प्रकारच्या कर्जांवर १ टक्का व्याज सवलत, कर्जासाठी आवश्यक शेअर रक्कम १० टक्क्यांवरून ५ टक्के, तसेच कर्ज मंजुरीची प्रक्रिया ९० दिवसांवरून अवघ्या ७ दिवसांवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. संगणकीकरण आणि १०० टक्के ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे विकास संस्थांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि विश्वासार्हता वाढल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी केले. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये मंगळवारी आयोजित ‘प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण मेळाव्या’त ते बोलत होते. यावेळी दि. ३० जून २०२६ अखेर जिल्हा बँकेच्या कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या ३४ प्राथमिक विकास संस्थांचा अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
श्री. दळवी म्हणाले, जिल्हा बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर १०.५० टक्के असल्यास विकास सहकारी संस्थेमार्फत गृहकर्ज घेणाऱ्या सभासदाला ते ९.५० टक्के व्याजदराने उपलब्ध होईल. ही सवलत केवळ गृहकर्जापुरती मर्यादित नसून सर्व प्रकारच्या कर्जांसाठी लागू करण्यात आली आहे. तसेच कर्जासाठी आवश्यक असलेली शेअर रक्कमही १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
यावेळी त्यांनी बँकेच्या नव्या १०० टक्के ऑनलाईन कर्जप्रक्रियेची माहिती दिली. सचिवांनी कर्जाची कागदपत्रे त्याच दिवशी पोर्टलवर अपलोड केल्यानंतर ती तात्काळ तालुका व मुख्य कार्यालयाला उपलब्ध होणार आहेत. कर्ज मागणीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीची आवश्यकता राहणार नसून चेअरमन व सचिवांच्या स्वाक्षरीने ऑनलाईन प्रस्ताव सादर करता येणार आहे. विकास अधिकाऱ्यांकडून आवश्यक स्थळ पाहणी ४८ तासांत पूर्ण करून अहवाल पोर्टलवर अपलोड केला जाईल. त्यानंतर मुख्य कार्यालयाकडून २४ तासांत मंजुरी देण्यात येईल आणि मंजुरीनंतर आणखी २४ तासांत कर्जाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाईल. पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांना अधिकाऱ्यांना थेट मंजुरीचे अधिकार देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांना वेळेची व व्याजाची बचत व्हावी आणि घरबसल्या सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे, हा या बदलांचा मुख्य उद्देश आहे, असे दळवी यांनी सांगितले.
संगणकीकरणामुळे विकास संस्थांच्या कामकाजात मोठा बदल झाल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, आता प्रत्येक संस्थेचे व्यवहार, ताळेबंद, आर्थिक पत्रके आणि जमा-खर्चाची माहिती विकास अधिकारी, मुख्य कार्यालय, नाबार्ड तसेच राज्य व केंद्र शासनाला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढली आहे. भविष्यात आधार, पॅन आणि सातबारा लिंक झाल्यानंतर सभासदाला किती कर्ज मिळू शकते, याची माहितीही सचिवांना तत्काळ देता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकास संस्थांतील सचिवांचे अत्यल्प मानधन ही गंभीर समस्या असून सचिव यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही दळवी यांनी सांगितले.
यावेळी दि. ३० जून २०२६ अखेर जिल्हा बँकेच्या कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या ३४ प्राथमिक विकास संस्थांचा अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तेंडोली, माणगाव, कर्याद नारूर, नेरूर, आंदुर्ले, घोटगे, निवजे, पाट, कुडाळ पंचक्रोशी, पणदूर-वेताळ बांबार्डे, कडावल, माड्याची वाडी, श्री लिंगेश्वर सोनवडे, कसाल, हिर्लोक, सरंबळ, हुमरमळा, झाराप, डिगस-आकेरी, बांबुळी, तुळसुली, चेंदवण, वालावल कृषी संघ, श्री महादेव कवठी, घावनळे, वालावल, वाडी वरवडे, साळगाव, केरवडे, पांग्रड, आवळेगाव आदी संस्थांचा सत्कार करण्यात आला. वाडी वरवडे विकास संस्थेचा संस्था स्तरावरील शंभर टक्के कर्जवसुलीबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर, रविंद्र मडगांवकर, चंद्रकांत माधव, भा. के. वारंग, दिपक नारकर, कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बाबा गावडे, के. बी. वरक, वसंत हडकर, शाम सरमळकर, निलेश कनयाळकर, संजय परब यांच्यासह तालुक्यातील विविध विकास संस्थांचे पदाधिकारी व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुडाळ तालुक्याच्या वतीने अध्यक्ष मनीष दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!