गाव तिथे उद्योजक अभियानाला कणकवली पंचायत समितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गाव तिथे उद्योजक” अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती या विषयावर केले मार्गदर्शन
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांच्या “गाव तिथे उद्योजक” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आज कणकवली पंचायत समिती येथे ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व ग्रामसेवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे यांनी उपस्थितांना “गाव तिथे उद्योजक” अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, ग्रामीण भागातील उद्योजकता विकासाच्या संधी तसेच प्रत्येक गावामध्ये स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगनिर्मितीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
याशिवाय प्रत्येक गावामध्ये “उद्योग विचारमंच” कसा स्थापन करावा, त्याची रचना, कार्यपद्धती, ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांचा सहभाग, तसेच नवउद्योजक घडविण्यासाठी आवश्यक असलेले विविध उपक्रम याबाबतही त्यांनी सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमास कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, विस्तार अधिकारी रामचंद्र शिंदे, सूर्यकांत वारंग, अधीक्षक मनोज सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य विशाल कामत व राजेश राजाध्यक्ष हेही उपस्थित होते.
कणकवली पंचायत समिती कार्यक्षेत्रातील ६४ गावांचे ग्रामसेवक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर उपस्थितांनी “गाव तिथे उद्योजक” ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त करत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने हे अभियान गावागावात प्रभावीपणे राबविण्यास उत्स्फूर्त सहमती दर्शविली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य विशाल कामत यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने कणकवली पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.






