गणेशघाटाचे काम पूर्णत्वास याचे समाधान पण निधी आम्ही आणला !

भंगसाळ नदी गणेशघाट कामाची वैभव नाईक यांनी केली पाहणी

कुडाळबाजूने संरक्षक भिंतीच्या कामाकडे वेधले लक्ष

भंगसाळ नदीकिनारी सुरु असलेल्या गणेशघाट कामाची माजी आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. या गणेश घाटाच्या कामासाठी आम्ही सत्तेत असताना सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्यामुळे दोन वर्षांनी का होईना भंगसाळ नदी सुशोभीकरणाचे काम पूर्ण होत आहे याबद्दल श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. पण हे काम सुरु असले तरी भंगसाळ नदीच्या पावशी गावाच्या बाजूने जशी संरक्षक भिंत बांधली आहे त्या प्रमाणे कुडाळ बाजूने सुद्धा संरक्षक भिंत बांधायच्या कामाला आम्ही मंजुरी आणली होती. पण सध्याच्या नगर पंचायतच्या दिरंगाईमुळे हे काम रखडल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला.
कुडाळ-भंगसाळ नदीकिनारी गणेश घाटाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची आज माजी आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली. सध्या हे काम कुडाळ नगर पंचायतच्या वतीने सुरु आहे. या कामाबाबत बोलताना वैभव नाईक म्हणाले, आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भंगसाळ नदी सुशोभीकरणाच्या कामासाठी मंदार शिरसाट उपनगराध्यक्ष असताना मंदार शिरसाट यांनी ९० लाख रुपये गणेश घाटाच्या नूतनीकरणासाठी आणले होते. तसेच पाच कोटी रुपये जमीन अधिकारणासाठी आपण आणले होते. तसेच २ कोटी रुपये भंगसाळ नदी सुशोभीकरणासाठी आणले होते. त्याच कामाची पाहणी करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आम्ही दिलेला शब्द पूर्ण होत आहे. पण केटी बंधारा आणि पावशी प्रमाणे कुडाळच्या बाजूने नदीला भिंत बांधण्याच्या कामाकडे सध्याच्या नगर पंचायत प्रश्नाकडून दुर्लक्ष होता असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हि थांबलेली कामे सुद्धा मंदार शिरसाट आणि आम्ही सर्व पाठपुरावा करून पूर्ण करु अशी ग्वाही दिली. आम्ही आणलेल्या निधीचा योग्य वापर होऊन गणेश घाटाचे काम पूर्ण होत असल्याबद्दल वैभव नाईक यांनी आनंद असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, प.स. सदस्य योगेश धुरी, सुशील चिंदरकर, बाळा पावसकर, संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर, अमित राणे, हर्षद काळप, शैलेश काळप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!