‘जिव्हाळा’ वृद्धाश्रमाचे काम प्रेरणादायी – मोहन आरोंदेकर

वृद्धांची परमेश्वररुपी मानवसेवा करण्याचे काम जिव्हाळा सेवाश्रम करत आहे, हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त बँक अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन आरोंदेकर यांनी माडयाचीवाडी येथे केले
श्री आरोंदेकर यांनी श्री सुरेश बिर्जे संचालित जिव्हाळा सेवाश्रमाला शुक्रवारी भेट दिली यावेळी यावेळी जिव्हाळा संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे शोभा बिर्जे राजू बिर्जे, साक्षी बिर्जे, सुंदर मेस्त्री, माजी सरपंच सचिन गावडे, संजय बिर्जे, नाना राऊळ, अँड श्रीमती माळी, चेतन माळी, दत्तात्रय पाटकर, संतोष सांगळे, जयप्रकाश प्रभू, गीतांजली बिर्जे, आर्या बिर्जे, संदीप बिर्जे, प्राजक्ता केळुसकर, अरुण परब, पूनम बिर्जे, दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री आरोंदेकर म्हणाले, जिव्हाळा सेवाश्रम नावाप्रमाणेच प्रत्येकाला जिव्हाळा लावून सेवा करत आहे. समाजसेवक सुरेश उर्फ दादा बिर्जे यांनी दहा वर्षांपूर्वी जिव्हाळा सेवाश्रमांची रोवलेली मुहूर्तमेढ आज अनेक निराधार वृद्धांसाठी आशेचा किरण ठरले आहे. विशेष म्हणजे या सर्व निराधार वृद्धांना हा जिव्हाळा म्हणजे आपले कुटुंब असल्याचे जाणवत आहे आणि ती भावना बिर्जे परिवार व त्यांच्या टीमने करून दिली आहे. या वृद्धांची सेवा करतानाच त्यांची आरोग्यसेवा त्यांच्यासाठी आवश्यक मनोरंजनात्मक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम हे सुद्धा या सर्वांसाठी मन प्रफुल्लित करणारे आहे. जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून या वृद्धांची परमेश्वररुपी मानवसेवा होत आहे आणि ही सेवा करताना श्री बिर्जे हे स्वतःची पदरमोड करून सेवा बजावत आहेत. माडयाचीवाडी या निसर्गरम्य ठिकाणी ते एक पंचतारांकित हॉटेल उभे करू शकले असते. परंतु त्यांची सेवाभावी वृत्ती वृद्धांची सेवा करण्याची त्यांची मनोभावे इच्छा एकूणच पाहता त्यांनी हा जिव्हाळा सेवाश्रम सुरू केला. सामाजिक बांधिलकी म्हणून या जिव्हाळा सेवाश्रमात सर्वांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. आज श्री बिर्जे व त्यांची टीम या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या 25 हून अधिक वृद्धांची सेवा मनोभावे करीत आहेत. अशा जिव्हाळामध्ये सेवा करण्यासाठी समाजातील दातृत्वगुणांची माणसे पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जिव्हाळा संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे यांनी जिव्हाळा सेवाश्रमचे दहा वर्षांपूर्वी लावलेले रोपटे हे आज अनेकांच्या सेवाभावी वृत्तीने बहरत आहे. नुकतेच भारत देशातील नामवंत उद्योगपती अनिल पातोदिया सौ अर्चना पातोदिया यांनी भेट देऊन जिव्हाळ्याचे केलेले कौतुक आणि प्रेरणादायी कार्य हे आमच्यासाठी निश्चितच सामाजिक बांधिलकी जोपासणारी ही सेवा आम्ही कोणताही खंड न पडता अखंड सुरू ठेवू असे सांगितले. आज या जिव्हाळा सेवाश्रमात पंचवीस हून अधिक वृद्धासह गोशाळा प्रकल्प आणि शैक्षणिक उपक्रमसुद्धा सुरू आहेत.भविष्यात रोजगार उपलब्ध करून देणारे अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.






