मच्छी विक्रेत्या महिले कडुन कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आचरा रोड जवळील प्रकार

सरपंच संदीप मेस्त्री यांच्याकडून गांभीर्याने दखल

“त्या” मच्छी विक्रेत्या महिलेवर अदखल पात्र गुन्हा दाखल

कणकवली तालुक्यात कलमठ आचरा रोड येथे अनधिकृतरित्या मासे विक्री करत असलेल्या विक्रेत्यांना कलमठ ग्रामपंचायतचे कर्मचारी गौरव तांबे हे हटविण्यासाठी गेले असता यातील सपना शिरसाट या मच्छी विक्रेत्या महिलेने श्री. तांबे यांना हाताच्या थापटाने मारहाण करत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून, मच्छी विक्रेत्यांची मजल आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मारहाण करेपर्यंत गेल्याने ग्रामपंचायत कडून देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली. याबाबत कलमठ ग्रामपंचायतचे सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामसेवक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत याबाबतची पोलिसांना माहिती दिली. महिला पोलीस कर्मचारी एडवे यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत सदर मासे विक्रेत्या महिलेला पोलिसात आणले. व त्यांच्यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या कारवाईत अन्य दोन मासे विक्रेत्यांचे मासे ग्रामपंचायतने जप्त केले असून, यापुढे अनधिकृत मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिला आहे. यापूर्वी देखील कलमठ ग्रामपंचायत कडून आचरा रोडवर बसणाऱ्या मासे विक्रेत्यांना हटविण्यात आले होते. तसेच कलमठ ग्रामपंचायत च्या असलेल्या मच्छी मार्केटमध्ये या विक्रेत्यांना बसण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही त्यावेळी त्यांच्याकडून वारंवार सूचनांचे उल्लंघन होत असल्याने सरपंच संदीप मेस्त्री यांच्या सूचनेनुसार गेले काही महिने सातत्याने ही कारवाई करण्यात येत आहे. या मच्छी विक्रेत्यांमुळे आचरा रोडवर सातत्याने वाहतूक कोंडी होत अनेकदा अपघात घडत असतात. मात्र मच्छी विक्रेत्यांकडून वारंवार ग्रामपंचायतच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने आता ही कारवाई अजून कडक करण्याचे संकेत सरपंच श्री मेस्त्री यांनी दिले आहेत. या कारवाई वेळी सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुड़तरकर, सदस्य नितिन पवार, श्रेयस चिंदरकर, ग्रामस्थ स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, सोमनाथ पारकर, वरिष्ठ सहाय्यक, दीपक गुरव, खुशाल कोरगावकर, मंगेश कदम, रूपेश कदम, मोहन कदम, प्रतीक उकर्डे उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!