स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने ओटव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला विरार येथे ठोकल्या बेड्या

स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या सिंधुदुर्गच्या पथकाची विरार – मुंबई येथे मोठी कारवाई

तांत्रिक सहाय्य घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील व पथकाने केली कारवाई

आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असल्याने तपासात महत्त्वाची माहिती हाती येणार

कणकवली तालुक्यातील ओटव येथे घराच्या दरवाजाची कडी तोडून मोबाईल, स्मार्ट वॉच सह अन्य वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी राजू तुकाराम सुतार (वय 35 वर्षे, मुळ रा.नाधवडे, ता. वैभववाडी,सध्या रा. रुम नं. 13, श्रमनिवास सोसायटी, नाना-नानी पार्क, विरार (पूर्व), जि. पालघर) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून विरार येथून घरातून शिताफीने अटक केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील यांच्या तपास कामाच्या तांत्रिक कौशल्यातून करण्यात आली. सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने केलेल्या कारवाई बद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस स्टेशन मध्ये भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3), 331(4) हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात फिर्यादी दिनेश शशिकांत कोरगांवकर, तसेच त्यांचे शेजारी नितेश रमेश देवळे यांच्या घराच्या समोरील दरवाजाची कडी हत्याराने तोडून घरात प्रवेश करुन 53,100/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 2 मोबाईल, एटीएम कार्ड, रोख रक्कम, स्मार्ट वॉच व इतर कागदपत्र असे अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेली होती.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास आणि गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक करत होते. या तपासा दरम्यान तांत्रिकदृष्ट्या काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती आले. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक विरार पोलीस ठाणे हद्दीत दाखल होत तिथे आरोपी राजू तुकाराम सुतार, याला पोलिसांनी जेरबंद केले. आरोपी राजू तुकाराम सुतार याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा स्वतः केल्याची समक्ष कबुली दिलेली आहे. संशयित आरोपीवर यापूर्वी अनेक ठिकाणी जवळपास दहा हून अधिक गुन्हे दाखल असून स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या सिंधुदुर्गच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामगिरीमुळे हा गुन्हा उघड झाला आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्री. मोहन दहिकर यांचे सूचनेनुसार श्री. प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सनील पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई यांनी केली आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!