जि.प. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक?

प्रशासनाची भूमिका संशयास्पद

ठेकेदारावर कारवाई कधी होणार ? – प्रसाद गावडे

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत कार्यरत 50 कंत्राटी वाहन चालक आणि 6 लॅब टेक्निशियन कर्मचाऱ्यांची सेवा पुरवठादार असलेल्या तांडेल ग्लोबल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नसल्याने नेमके अधिकारी की पदाधिकारी त्याला पाठीशी घालत आहेत, अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू असल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
प्रसाद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या कंत्राटी वाहन चालकांच्या मूळ निविदेत प्रति कर्मचारी प्रतिमहिना 24 हजार 569 रुपये वेतन, 946 रुपये सेवा शुल्क आणि 4 हजार 422 रुपये जीएसटी अशी एकूण 29 हजार 937 रुपयांची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खात्यात केवळ 14 हजार रुपये वेतन जमा केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जीएसटी आणि सेवा शुल्क वगळल्यानंतरही उर्वरित सुमारे 10 हजार 569 रुपये प्रतिमहिना प्रति कर्मचारी ठेकेदाराकडून बेकायदेशीररीत्या ठेवले जात असल्याचा दावा गावडे यांनी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असून जिल्हा परिषदेच्या निधीचीही लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मागील आठ महिन्यांपासून सुमारे 4 लाख 80 हजार रुपये प्रतिमहिना कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वळविले जात असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना मंजूर वेतनाचा पूर्ण लाभ मिळावा, अशी मागणी प्रसाद गावडे यांनी केली आहे. उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!