आंबोली मॅरेथॉन साठी ७०० हुन अधिक धावपटू सहभागी

२१, १५, १० आणि ५ किमी गटात उद्या होणार स्पर्धा
मायकल डिसुझा आणि गजानन कांदळगावकर यांनी दिली माहिती
सह्याद्रि अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित उद्या रविवार 2ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून ७०० धावपटू सहभागी झाले आहेत अशी माहिती गजानन कांदळगावकर व मायकेल डिसूझा यांनी दिली.
सह्याद्री अॅडव्हेंचर अॅण्ड रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेली व सायकलीस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ०२ ऑगस्ट रोजी आंबोली येथे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आंबोली मान्सुन मॅरँथॉन २१ कि.मी., १० कि.मी. व ५ कि.मी. अशा गटात मॅरेथॉन होणार आहे. मॅरेथॉनचे मार्ग ५ किमी साठी आंबोली चेकपोस्ट ते शिरगावकर सनसेट पाईंट, १० किमी साठी आंबोली चेकपोस्ट ते नेणेवाडी, २१ किमी आंबोली चेकपोस्ट ते चौकुळ तोरपवाडी असा असणार आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे देखील आहेत. २१ किमी – प्रथम रोख २० हजार व चषक, द्वितीय रोख १५ हजार व चषक, १० किमी – प्रथम – १० हजार व चषक, द्वितीय ७ हजार व चषक, ५ किमी मध्ये सर्व स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
३५ ते ४५ वयोगट पुरुष-महिला, ४५ ते ६० वयोगट पुरूष – महिला, वयोगट ६० वर्षावरील पुरुष-महिला अशा वयोगटात हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग तथा संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तथा इतरही राज्यांमधून धावपटू सहभागी झाले आहेत. सहभागी धावपटूंना टी-शर्ट, आकर्षक मेडल व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ठीक ७ वाजता उद्घाटन व फ्लॅग ऑफ होऊन स्पर्धेला सुरुवात होईल.
यावेळी माजी पालकमंत्री व सावंतवाडीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधिक्षक मोहन दहीकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल सेवा फाउंडेशनचे विशाल परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, आदी मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत.
सकाळी ठीक ९ वाजता धावपटूंना मेडल व प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल. आंबोलीच्या गार हवेत, रिमझिम पावसात, शुभ्र धुक्याच्या चादरीत, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून धावण्याचा मनमुराद आनंद लुटावा. तसेच निसर्गप्रेमी, पर्यटक, व नागरिकांनीही या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्हयातील जास्तीत जास्त धावपटूंनी या आंबोली मान्सून मॅरँथान मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.






