नेरूरला आधुनिक आरोग्य उपकेंद्राची भेट

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

ग्रामीण आरोग्यसेवेला नवी उभारी

कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे उपकेंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी पडते, रुपेश कानडे, दीपक नारकर, सभापती मिलिंद नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, संजय पडते, काका कुडाळकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्रास्ताविकात उपकेंद्राच्या उभारणीची माहिती देताना सांगितले की, २०१३ मध्ये या उपकेंद्राचे निविदा प्रक्रियेद्वारे काम सुरू झाले. सुमारे १३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या इमारतीसाठी ५५ लाखांचे अंदाजपत्रक असताना प्रत्यक्षात ४४ लाख रुपयांत काम पूर्ण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील १७ उपकेंद्रे व १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, प्रशासकीय मान्यता मिळताच ही कामे सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
आमदार निलेश राणे यांनी आरोग्य सुविधांच्या विस्तारावर भर देत नेरूरनंतर मसुरे येथील उपकेंद्राचेही लवकरच लोकार्पण होणार असल्याचे सांगितले. नव्याने उभारलेल्या इमारतीची योग्य देखभाल करण्याबरोबरच आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपकेंद्राकडे जाणारा चढणीचा रस्ता नागरिकांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पालकमंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांचे स्वप्न म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा गोव्याला जाण्याची गरज भासू नये, असे सांगितले. ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक निधी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दर दोन महिन्यांनी उपकेंद्राचा आढावा घ्यावा तसेच नियुक्त कम्युनिटी हेल्थ ऑफिसरने (CHO) नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी या उपकेंद्रातून नागरिकांना जलद, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी तत्परतेने काम करतील, अशी ग्वाही दिली.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यामुळे नेरूर व परिसरातील नागरिकांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवेची नवी आशा निर्माण झाली असून, हे उपकेंद्र ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारे ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!