लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांना ‘शिव सन्मान पुरस्कार–२०२६’ जाहीर

रायगड सेवा समितीकडून सुधीर मुनगंटीवार यांचा सन्मान

१ ऑगस्टला दादरमध्ये पुरस्कार प्रदान सोहळा

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने सन २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘शिव सन्मान पुरस्कार’ ज्येष्ठ लोकनेते, शिवभक्त तथा महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह दादर येथे आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली
श्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवराज्याभिषेक सोहळ्याची परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि शिवकालीन स्मृतींचे जतन-संवर्धन यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चांदीची पालखी अर्पण करून या ऐतिहासिक सोहळ्याच्या वैभवात मोलाची भर घातली. तसेच श्रीक्षेत्र प्रतापगडावरील श्री भवानी मातेला चांदीचे छत्र अर्पण करून त्यांनी शिवभक्ती, श्रद्धा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.
इतिहास संवर्धनाच्या दृष्टीने त्यांच्या कार्यातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे, जी अनेक वर्षे लंडनमध्ये जतन करण्यात आली होती, ती महाराष्ट्रात प्रथमच प्रदर्शित होण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका. या ऐतिहासिक उपक्रमामुळे लाखो शिवप्रेमींना या ऐतिहासिक ठेव्याचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आणि शिवकालीन इतिहासाबद्दल जनमानसात नव्याने अभिमानाची भावना निर्माण झाली.याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन हा इंग्रजी दिनांकानुसार नव्हे, तर हिंदू पंचांगातील ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसारच शासनामार्फत अधिकृतरीत्या साजरा करण्यात यावा, या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयासाठी त्यांनी सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक पाठपुरावा केला.
शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखत या विषयात त्यांनी शासनस्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.शिवकार्य, इतिहास संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वैभव वृद्धिंगत करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागर करण्यासाठी दिलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने त्यांना ‘शिव सन्मान पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवर, इतिहास अभ्यासक, दुर्गप्रेमी, शिवभक्त आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, राज्यभरातील शिवप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे सुनील पवार यांनी सांगितले.

error: Content is protected !!