दिल्लीतील घडामोडींवर कुडाळात भाजप आक्रमक

मानवी साखळीतून व्यक्त केला मोदी सरकारला पाठिंबा
घोषणांनी परिसर दणाणला
सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतर वर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकारला समर्थन देण्यासाठी गुरुवारी सकाळी कुडाळ तालुका भारतीय जनता पक्षाने एकजूट दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. येथील भाजप कार्यालयासमोर पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेला आपले समर्थन दिले. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे समर्थन देण्यात आले. नीट परीक्षेबाबत जो गैर व्यवहार झाला त्याची आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी बाबत चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल अशी आशा यावेळी प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली.
येथील कुडाळ भाजपच्या कार्यालयासमोर आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील भाजप कार्यकर्ते एकत्र जमले होते. कार्यालयासमोरच्या मुख्य रस्त्यावर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येत मानवी साखळी तयार केली. हात मोदी सरकारच्या समर्थनार्थ फलक घेऊन केंद्र सरकारच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. भारत माता कि जय, वंदे मातरम, देश प्रथम – राजकारण नंतर, विकस्टी भारतासोबत मोदी सरकारसोबत, जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, दिल्ली मध्ये ज्या काही घडामोडी चालल्या आहेत, त्या संदर्भात केंद्र सरकारला समर्थन देण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. नीट परीक्षा घोटाळा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थी पालक याना झालेला मानसिक त्रासअशा कोणत्याच गोष्टींचे आम्ही समर्थन करत नसल्याचे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी करत असलेले आंदोलन सनदशीर मार्गाने असले तरी त्यात अन्य शक्ती घुसून आपला फायदा करून घेत आहेत. एक मोठे राजकारण सुरु आहे. देशात अराजकता माजविणायचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात देश व्यवस्थित प्रकारे हाताळला, तरुणांना विकसित भारताचे स्वप्न दाखवले,अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीत देशातली परिस्थिती सामान्य ठेवली, अशी वेळी मोदींच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा कोणी अवमान करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले. म्हणूनच देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या मोदीजींना समर्थन देण्यासाठी आज आम्ही एकत्र आल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.
दिल्ली मध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीबाबत बोलताना प्रभाकर सावंत याणी सांगितले, या विषयाबाबत सुद्धा आमच्या भावना तीव्र आहेत, आम्ही संवेदनशील आहोत. पण काही विद्यार्थी खऱ्या न्यायाच्या अपेक्षेने तिथे आले होते. पण काही समाजविघातक शक्ती त्या आंदोलनात घुसल्या. त्यामुळे हा मारहाणीचा प्रकार घडला. त्या प्रकारची चौकशी होईल आणि मुद्दाम काही गोष्टी कोणी केल्या असतील तर त्यावर सुद्धा कारवाई होईल असे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्य्क्ष प्रभाकर सावंत यांच्या सह जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पंचायत समिती उपसभापती सीताराम तेली, बंड्या सावंत, राजू राऊळ, पाप्या तवटे, नगरसेवक निलेश परब, श्रेया गवंडे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, जि प सदस्य आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, मोहन सावंत, सुनील बांदेकर, प.स. सदस्य योगेश प्रभू, तन्मय वालावलकर, जयेश चिंचाळकर, निलेश तेंडुलकर, ममता धुरी, शिल्पा घुर्ये, मुक्ती परब, नितीन म्हाडेश्वर, अभय परब, समाधान परब, राजू गवंडे आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






