जिल्हा परिषद मधील बिलांवर बोगस सह्या प्रकरणी सिंधुदुर्गातील पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल

पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ कारवाई

गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजत होता प्रकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदार वर्तुळात मोठी खळबळ

बोगस सह्या करून जि. प. बांधकाम विभागाकडील बिले व अनामत रक्कम लाटण्याचा प्रताप करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच ठेकेदारांवर अखेर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मोहन उर्फ राहुल विद्याधर केळुस्कर (राहणार कणकवली), ओंकार नंद‌कुमार पडते (राहणार पडतेवाडी कुडाळ), ओंकार तुळशीराम पाताडे (राहणार सुकळवाड, मालवण), मंदार आनंद दामोदर (राहणार पडवे शिर्केवाडी), लक्ष्मण शिवराम राऊळ (राहणार कारिवडे सावंतवाडी) यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या सह्या करून काही कामांच्या बिलांच्या देयकाला, तर काही अनामत रकमांच्या देयकाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान कंत्राटदार मोहन उर्फ राहुल केळुसकर यांच्या देवगड उप विभागातील साळशी देवणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे दुसरे तथा अंतिम देयक सहीसाठी बांधकाम विभागाकडे प्राप्त झाले होते. देयक व मोजमाप पुस्तिकेवर कार्यकारी अभियंता यांनी सही केल्यानंतर यापूर्वीच्या १४ ऑक्टोबर २०२५ रोजी अदा झालेल्या पहिल्या बिलावरील सही आपली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. तसेच त्या बनावट सहीने संबंधित कंत्राटदाराला ६ लाख ७६ हजार ५८८ रुपये अदा झाल्याचे निदर्शनास आले होते. त्या शिवाय २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीतील पूर्ण झालेल्या एकूण १० कामांच्या अनामत
रकमा परत मिळण्याच्या संदर्भातील प्रस्तावावरील सह्या आपल्या सहीशी जुळत नसल्याचे कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आले होते. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी ही बाब उघड झाली होती. तर १० फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाकडील दोन कामांची देयके वित्त विभागाने सही जुळत नसल्याची त्रुटी काढून बांधकाम विभागाकडे परत पाठविली होती. दरम्यान सह्या जुळत नसलेली सर्व प्रकरणे पुढील कारवाईसाठी राखून ठेवत १६ फेब्रुवारी रोजी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या बाबतचा अहवाल कार्यकारी अभियंता यांनी दिला होता व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती. जि. प. सीईओंनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी याबाबत चौकशीअंती फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राजेंद्र सावंत यांना १८ मे २०२६ रोजी दिले होते. त्यानंतर आजपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने जिल्हाभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कालच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना मध्ये धडक दिली होती. जि. प. पदाधिकारी यांनी या प्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर पालकमंत्री नीतेश राणे यांनी मी पालकमंत्री आहे कुणीही गॉड फादर असू दे पुन्हा हिम्मत करणार नाहीत असा इशारा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिला होता. तसेच याबाबत दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी १६ जून रोजी पोलिसांत तक्रार दिली. संशयित आरोपींनी संगनमत करून ३० सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत देयके तयार करून त्यावर कार्यकारी अभियंता पदाचा शिक्का मारला. तसेच ओंकार पाताडे याने त्यावर आपली बनावट सही करून ती खरी असल्याचे भासवून १० लाख ४३ हजार ४४१ एवढी रक्कम बेकायदेशीररित्या मिळविण्याच्या उद्देशाने जि. प. कडे देयके सादर करून आपली व पर्यायाने शासनाची फसवणूक केली असल्याने पाचही संशयित आरोपीविरुद्ध आपली कायदेशीर तक्रार असल्याचे राजेंद्र सावंत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६ (२), ३३६ (३). ३३८. ३४० (२), ३(५) नुसार संगनमताने फसवणूक, मौल्यवान रोख्याचे बनावटीकरण करणे तसेच बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!