कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आरोग्य विभाग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक कांबळे यांची बिनविरोध निवड.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेला नवे नेतृत्व
कणकवली/प्रतिनिधी:
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आरोग्य विभाग संघटनेची वार्षिक सभा दिनांक १४ जून २०२६ रोजी ओरोस येथे उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष मा.संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सन २०२३ ते २०२५ या कालावधीचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.यावेळी नव्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी झालेल्या प्रक्रियेत श्री.दीपक कांबळे यांची आरोग्य विभाग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच श्री. संतोष बनसोडे यांची महासचिवपदी,श्री.आर.डी. चेंदवणकर यांची कोषाध्यक्षपदी आणि श्री. सुधीर धामणकर यांची कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.याशिवाय २१ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.सभेत मार्गदर्शन करताना मा.संदीप कदम यांनी संघटनेच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ, वेतन आयोग, पदोन्नती, भरती प्रक्रिया, पेन्शन योजना आदी महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले.प्रत्येक महिन्यात जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन विविध प्रश्न शासन दरबारी मांडले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.नवनिर्वाचित आरोग्य विभाग जिल्हाध्यक्ष दीपक कांबळे यांनी आपल्या मनोगतात मागील २७ वर्षांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेत कर्मचारी हितासाठी विविध आंदोलने, मोर्चे, सभा आणि निवेदनांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कोरोना काळात आरोग्य विभागातील आशा सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व इतर कर्मचाऱ्यांना “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानपत्र मिळवून देण्यासाठी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
सभेच्या शेवटी महासचिव संतोष बनसोडे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांचे आभार मानले. अध्यक्ष मा. संदीप कदम यांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.





