ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती

म्हणाले, उत्तम मंत्री…!
खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक केले. विधान परिषदेतील घोडेबाजारावरून भाजपला घेरल्यानंतर राणेंनी पाठवलेल्या ‘बरनॉल’ला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी हे अनपेक्षित वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे हे नेहमीच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करत असतात. त्यांच्यावर नेहमी आगपाखड करत असतात. पण संजय राऊत नितेश राणे यांच्या टीकेवर कधीच कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजारावरून राऊत यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यामुळे नितेश राणे यांनी राऊत यांना बरनॉल पार्सल पाठवून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं, तेव्हा राऊत यांनी नितेश यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली. राज्यातील उत्तम काम करणाऱ्या मंत्र्यांपैकी नितेश हे एक असल्याचं राऊत म्हणाले. राऊत यांनी पहिल्यांदाच नितेश राणे यांची तोंडभरून स्तुती केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
खासदार संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना नितेश राणे यांच्या गिफ्टवरून डिवचण्यात आलं. त्यावर राऊत यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. मी काही त्यांना रिटर्न गिफ्ट पाठवणार नाही. त्यांनी दिलेल्या गिफ्टचा मी स्वीकार करेन. अनेक रुग्ण आहेत. त्यांना त्यांनी दिलेलं गिफ्ट पाठवेन. पण त्यांनी बरनॉल का ठेवलं? ते काय जखमी झाले होते का? त्यांना बरनॉल ठेवण्याची गरज का पडली?, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
तुम्ही तरुण मंत्री आहात. तुमचं कुटुंब मूळचं बाळासाहेबांच्या नेतृत्वातील आहे. एक लक्षात ठेवा, सत्ता अमर नसते. सत्ता येते जाते.
खात्याकडे लक्ष द्या. राज्यात जे मंत्री उत्तम काम करतात त्यापैकी नितेश राणे हे एक आहेत. मत्स्य विभाग खातं त्यांच्याकडे आहे. महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. उत्तमरित्या ते हे खातं सांभाळत आहेत. त्यांनी चांगल्या योजना आणल्या आहेत. हे मी सांगू शकतो, असं संजय राऊत म्हणाले.





