अपघाताची तक्रार घेण्यासाठी महिलेला कणकवली पोलीस स्टेशन मध्ये ठेवले पाच तास ताटकळत

अपघातातील महिला गंभीर जखमी असल्याने बांबुळी येथे सुरू आहे उपचार

कणकवली पोलिसांच्या प्रकाराबद्दल जनतेतून व्यक्त होतोय संताप

जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देणार का?

एका अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या अपघाताप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलेल्या जखमी महिलेच्या नातेवाईक असलेल्या महिलेला तब्बलतास पाच तास कणकवली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेण्यासाठी ताटकळत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सदर तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, कणकवलीत महामार्गावर हुंबरट मध्ये झालेल्या अपघातात 75 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती. या जखमी महिलेला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार देण्यासाठी ही नातेवाईक महिला आज शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून दुपारी जवळपास दोन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबून होती. परंतु कणकवली पोलिसांकडून कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा, तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची व्हिसी चालू असल्यामुळे पोलीस निरीक्षक या कामांमध्ये व्यस्त आहेत. याबाबत मार्गदर्शन घ्यावे लागणार असे सांगत तब्बल पाच तास म्हणजेच दुपारी दोन वाजेपर्यंत या तक्रार देण्यासाठी गेलेल्या नातेवाईक महिलेला पोलीस स्टेशन मध्ये थांबून ठेवण्यात आले. सर्वसामान्य जनतेला अशा प्रकारे तक्रार देण्यासाठी पाच तास पोलीस स्टेशनमध्ये राहावे लागत असेल तर पोलिसांचा हाच लोकाभिमुख कारभार म्हणावा का? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा? कोणते कलम गुन्ह्यात वापरावे हा पोलिसांच्या तपासाचा भाग झाला. मात्र अपघाताबाबतची तक्रार देण्यासाठी जखमी महिलेचे नातेवाईक व प्रत्यक्षदर्शी समोर असून देखील पोलीस अशाप्रकारे तक्रार नोंदवून घेण्यासाठीच पाच तास लावत असतील तर याला जबाबदार कोण? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. 2 जून रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात महामार्गावर घडला. त्यानंतर त्या गंभीर जखमी झालेल्या महिलेला अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलवण्यात आले. दरम्यान सदर अपघाताची तक्रार देण्यासाठी आज शनिवारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या महिलेची तक्रार सकाळपासून आतापर्यंत का घेतली जात नाही? याबाबत दुपारी दोन वाजता पोलिसांना विचारणा केल्यानंतर तक्रार घेण्याच्या अनुषंगाने हालचाल सुरू करण्यात आली. मात्र पाच तास सर्वसामान्य नागरिक तक्रार देण्यासाठी ताटकळत पोलीस स्टेशन मध्ये राहिले त्याला जबाबदार कोण? जनतेला लोकाभिमुख सेवा देणे या सर्व कार्यपद्धतीमध्ये बसते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कणकवली पोलिसांच्या या साऱ्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात असून याबाबत वरिष्ठ आता काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!