मालवण दांडी समुद्रकिनारी पर्यटकाची स्टंटबाजी; युवती थोडक्यात बचावली, चालकाची समुद्रात उडी

दांडी येथील दांडेश्वर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या बेफिकीर स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास घडला. एका पर्यटक तरुणाने आपल्या थार गाडीने समुद्रकिनाऱ्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने एक स्थानिक युवती थोडक्यात बचावली. या घटनेनंतर निर्माण झालेल्या गोंधळात संबंधित चालकाने गाडी किनाऱ्यावर सोडून थेट समुद्रात उडी घेतल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक तरुण समुद्रकिनाऱ्यावर वेगाने आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवत होता. त्याचवेळी किनाऱ्यावरून जाणाऱ्या एका स्थानिक युवतीच्या दिशेने गाडी गेल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र सुदैवाने युवतीला कोणतीही दुखापत झाली नाही.
या प्रकारानंतर युवती आणि परिसरातील काही स्थानिकांनी संबंधित चालकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या चालकाने आपली थार गाडी पद्मगड किनाऱ्याच्या दिशेने वेगाने नेली. काही स्थानिक तसेच पर्यटक व्यवसायिकांनी त्याचा पाठलाग केला.
स्वतःला घेरले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने पद्मगड किनाऱ्यावर वाहन उभे केले आणि थेट समुद्रात उडी घेतली. त्यानंतर तो सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने समुद्रात पोहत पुढे जात असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मालवण पोलिसांना तसेच समुद्रातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या होडी व्यवसायिकांना सतर्क केले. तत्परतेने शोधमोहीम राबवत होडी चालकांनी संबंधित तरुणाला समुद्रातून सुरक्षित बाहेर काढून मालवण बंदर जेटी येथे आणले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मालवण पोलीस ठाण्यात नेले.
दरम्यान, पद्मगड किनाऱ्यावर उभी करण्यात आलेली थार गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेमुळे दांडी आणि पद्मगड परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. समुद्रकिनाऱ्यांवर वाढत चाललेल्या धोकादायक स्टंटबाजीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.





