पिंगुळी-गुढीपूर येथे आढळला सेवानिवृत्त लिपिकाचा मृतदेह

मृत्यूचे कारण अस्पष्ट

पिंगुळी-गुढीपूर येथे भाड्याच्या घरात एकटे राहणारे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त लिपिक विजय सोनू कळंबटे (वय ६४, मूळ गाव हातखांबा, रत्नागिरी) शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विजय कळंबटे यांनी आंबडपाल येथील पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर ते कुटुंबासह पिंगुळी-गुढीपूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे दोन्ही मुलगे नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात, तर पत्नी एका मुलाकडे राहण्यासाठी गेल्याने कळंबटे सध्या घरात एकटेच राहत होते.
शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरातील एक महिला फुले गोळा करण्यासाठी त्यांच्या घराजवळ गेली होती. त्यावेळी घराचा दरवाजा बंद असल्याचे आणि घरातून दुर्गंधी येत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने आवाज देऊन पाहिले; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कुडाळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गुरुदास पाडावे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव आणि संदीप वराडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून तपासणी केली असता, कळंबटे यांचा मृतदेह घरात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केले.
कळंबटे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!