कुडाळच्या महामार्गाला मिळणार ५० वटवृक्षांची हिरवी ओळख

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि संविता आश्रम पणदूरतर्फे वृक्षसंवर्धनाचा संकल्प
पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि संविता आश्रम पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई–गोवा महामार्गावरील भंगसाळ नदी ते काळप नाका या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा ५० वडाची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रोटरी क्लबचे सदस्य गजानन कांदळगावकर यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाच वडाची झाडे लावून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
महामार्गाच्या दुतर्फा वडाच्या झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. ही झाडे मोठी झाल्यानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होण्याबरोबरच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावलीही मिळणार आहे. भविष्यात वडाच्या झाडांनी बहरलेला हा महामार्ग कुडाळच्या पर्यावरणपूरक ओळखीमध्ये भर घालेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटरी क्लबच्या प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसानिमित्त एक वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता त्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, राजीव पवार, प्रणय तेली, नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, माजी नगरसेवक आबा धडाम, प्रथमेश केळवाईकर, शैलेश काळप, राजवीर पाटील, श्री. कांबळी तसेच संविता आश्रम पणदूरचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.
‘वाढदिवस साजरा करूया, एक झाड लावून; झाडे लावूया, झाडे जगवूया’ हा संदेश देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.






