देवगडच्या मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; एक युवक बेपत्ता, एकाची प्रकृती चिंताजनक

देवगड हादरले! मिठमुंबरी बागवाडी येथे समुद्रात बुडण्याची घटना
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक युवक समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. तर एका युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादर नायगाव येथील काही युवक देवगड येथे फिरण्यासाठी आले होते. रविवारी सायंकाळी ते मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी गेले असता त्यापैकी चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते अडचणीत सापडले.
मदतीसाठी आरडाओरडा ऐकताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमारांनी नौकेच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ओम चव्हाण, सोहम मांडोरे आणि अर्णव तारी यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात यश आले. यामध्ये सोहम मांडोरे याची प्रकृती बिघडल्याने प्रथम देवगड ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जामसंडे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, चैत्य गुरव हा युवक समुद्रात बेपत्ता झाला असून स्थानिक मच्छीमारांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा व माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू केली.
या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





