राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर व कॅरमपटू साक्षी रामदूरकर यांचा सत्कार

मुक्ताई ॲकेडमीच्या दहाव्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे बुद्धिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर आणि कॅरमपटू साक्षी रमेश रामदूरकर यांचा सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक विनायक नार्वेकर, सुशांत पाटणकर, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या संचालिका अनुपमा शेटगे, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी बुद्धिबळ आणि कॅरममध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविल्याबद्दल कौतुक केले. ॲकेडमीच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. उपस्थित मान्यवरांनी ॲकेडमीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ मध्ये पुणे येथे झालेल्या कोचिंग कॅम्पसाठी भारतातील २०० खेळाडूंमधून बाळकृष्ण यांची निवड झाली होती. या कॅम्पसाठी निवड झालेला तो कोकणातील एकमेव खेळाडू ठरला.
शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विभाग स्तरावर सलग चार वेळा आणि राज्य स्तरावर दोन वेळा निवड होण्याचा मानही बाळकृष्ण यांनी मिळवला आहे. गेल्याच महिन्यात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुक्ताई ॲकेडमीचे पहिले अधिकृत राज्य पंच (आर्बिटर) झाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कॅरमपटू साक्षी रामदूरकर हिने सलग चार वर्षे शालेय तसेच असोसिएशनच्या जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय कॅरम स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवली आहे. कॅरमसोबतच बुद्धिबळ स्पर्धेतही सलग चार वर्षे विभाग स्तरावर निवड होणारी साक्षी ही कोकणातील एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दलही तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्नेहा पेडणेकर यांनी केले.






