श्री रामेश्वर वाचन मंदिराची अभ्यास सहल उत्साहात

देवगड तालुक्यातील पुस्तकांचे गाव मालपे, बेबीकार्न उद्योग, गोशाळा आणि ऐतिहासिक मंदिरांना दिल्या भेटी

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या आणि विविध उपक्रम राबविणाऱ्या श्री रामेश्वर वाचन मंदिराच्या कार्यकारी मंडळ आणि सांस्कृतिक समितीचा अभ्यास दौरा यंदा देवगद तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यात पर्यटन धार्मिक स्थळांना भेटी देण्यासोबतच काही प्रक्रिया उद्योगानाही भेटी देत उद्यमशीलताही आत्मसात केली. या सहलीची सुरुवात निसर्गरम्य अशा सावडाव धबधबा परीसराला भेट देऊन करण्यात आली.यानंतर प्राचीन पांडवकालीन समजले जाणारे वेळगीवे येथील रामेश्वर मंदिराला भेट देत मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्णतेची माहिती जाणून घेतली.या गावचे सरपंच राजन लाड, उपसरपंच सहदेव लाड आदींनी वाचनालय पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करत मंदिर आणि गावच्या परंपरा रुढी बाबत माहिती दिली.यासोबतच कोर्ले ब्रम्हदेव मंदिर, चैतन्य आश्रम,उंडील येथील काळे यांची बेबी कॉर्न फॅक्टरी,करंजे गोशाळा आदी ठिकाणांसह
पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालपे गावातील वाचनालयालाही भेट दिली.
या सहलीत आचरा जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा संजू महाजनी, तसेच अंजली बापर्डेकर,कार्यकारी मंडळाचे भिकाजी कदम,सौ दिपाली कावले, विरेंद्र पुजारे, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समितीचे राजा जोशी,रुपेश साटम,कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर, श्रद्धा महाजनी, कर्मचारी महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण यांसह अन्य सहभागी झाले होते.या अभ्यास सहली बाबत प्रतिक्रिया देताना वाचन मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी सांगतात
पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालपे गावातील वाचनालयाला* भेट देणे हा दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. वस्तीपासून दूर असलेले हे वाचनालय सुसज्ज असले तरी वाचकांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले.
उंडील येथील बेबीकार्न कंपनीला भेट देण्यात आली. रोजगाराभिमुख असा हा उद्योग पाहून नवी दिशा मिळाली.
त्यानंतर चैतन्य आश्रमातील त्रिपुरासूर मर्दानी देवीचे मंदिर आणि तेथे चालणाऱ्या अगरबत्ती निर्मितीच्या रोजगार प्रकल्पाला भेट दिली. महाविद्यालयीन मुले अर्धवेळ काम करतात हे ‘कमवा आणि शिका’ चे उत्तम उदाहरण याठिकाणी दिसून आले.
करंजे, कणकवली येथील गोवर्धन गोशाळेला भेट देऊन पर्यावरण रक्षण आणि गोसंवर्धनातून होणाऱ्या रोजगार निर्मितीची माहिती घेतली.
वेळगिवे येथील गुहेतील पांडवकालीन शिवमंदिर आणि कोर्ले गावातील ब्रम्हदेव मंदिर या नितांतसुंदर आणि शांत ठिकाणांनाही भेट देण्यात आली.

सौ. आणि श्री. बापार्डेकर यांच्या नियोजनासोबतच स्थानिक सरपंच उपसरपंच यांच्या सहकार्याने हा १४ तासांचा दौरा यशस्वी झाला.
वाचनालय कार्यकर्त्यांनी अशा अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करावे. त्यामुळे नवीन ऊर्जा मिळते आणि काय हवे-काय नको ते समजते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या दौऱ्याचे नियोजन तलाठी सौ. सुनिता मेस्त्री-बापर्डेकर आणि पत्रकार अर्जुन बापर्डेकर यांच्या परिचय आणि लोकसंग्रहामुळे यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया वाचनालय मंडळींनी व्यक्त केली.

error: Content is protected !!