ओबीसी समाजातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणार : उदयसिंह गायकवाड

ओबीसी पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ओबीसी समाजातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने आणि ओबीसी व आरक्षित महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध ओबीसी प्रवर्गांसाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, शिष्यवृत्ती, शैक्षणिक सुविधा तसेच महामंडळांच्या कर्ज योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी ओबीसी व आरक्षित महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, समता परिषदेचे समन्वयक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, ओबीसी महासंघाचे राज्य समन्वयक सुनील भोगटे, सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी स्वप्निल कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध ओबीसी समाज संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन वाळके यांनी शासनाच्या योजनांचा अभ्यास करून समाजातील जास्तीत जास्त घटकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. काका कुडाळकर यांनी जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत लक्ष वेधले. जिल्ह्यात ३० हजारांहून अधिक ओबीसी विद्यार्थी असताना केवळ साडेसात हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शालेय स्तरापासून योजनांबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध न झाल्यास आधार योजनेचा लाभ घ्यावा. तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या मोठ्या शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. कुडाळकर यांनी केले.
ओबीसी समाजासाठी विविध महामंडळांच्या माध्यमातून कर्ज योजना उपलब्ध असून नवउद्योजक व व्यावसायिकांनी त्याचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असेही त्यांनी सांगितले. सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांच्यासारखा सकारात्मक दृष्टिकोन असलेला अधिकारी लाभल्यामुळे समाजाचीही जबाबदारी वाढली असून, उपलब्ध योजनांचा पुरेपूर वापर करून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे कुडाळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुनील भोगटे, संदीप कदम यांनीही विचार मांडले. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये गणेश हुकीरे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक; प्रीती पटेल, जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे महामंडळ; वर्षा कासले, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ; सुरज बागवे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांचा सहभाग होता.
यावेळी बाळ कनयाळकर, संदीप कदम, सुनील पाटकर, संदीप चव्हाण, सुहास मोचेमणकर, तुकाराम तेली, साईनाथ आंबेडकर, लक्ष्मण तेली, सौ.अमिदी मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाङ्मयाचे पुस्तक भेट देण्यात आले. भविष्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशाच प्रकारची माहिती शिबिरे आयोजित करण्याचा मनोदय सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी व्यक्त केला.






