शिक्षक समितीचे कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर २६ ऑगस्टला

कोकणातील पदाधिकारी राहणार उपस्थित
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथील सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या कै. द. सि. सामंत गुरुजी सभागृहात करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिराला कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आज ओरोस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिबिराबाबत माहिती देताना स्वागताध्यक्ष तथा शिक्षक समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी सांगितले की, सिंधुदुर्गसह रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका, जिल्हा व राज्य पदाधिकारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. संघटनात्मक चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी संघटनेतील ज्येष्ठ मार्गदर्शकांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
या शिबिराचे आयोजन करण्याची संधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेला मिळाली असून राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आणि कोकण विभागप्रमुख रूपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन राज्य शिक्षक नेते उदय शिंदे आणि राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या हस्ते होणार आहे. राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, आनंदा कांदळकर व विलास कंटेकुरे, राज्य कार्याध्यक्ष सह्याजी पाटील, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांच्यासह राज्य, विभाग व जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात ‘शासन निर्णय मार्गदर्शन’, ‘संघटनेतील कार्यकर्ता कसा असावा’, ‘शिक्षक समिती आणि चळवळ’, ‘अशी घडली शिक्षक समिती’ आणि ‘शिक्षक व शालेय कामकाजाबाबत जागृतता’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय संघटनात्मक प्रश्नोत्तर व सुसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत नावनोंदणी व चहा-नाश्त्याने होईल. त्यानंतर १०.३० वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. स्वागताध्यक्ष विठ्ठल गवस यांचे मनोगत, कोकण विभागप्रमुख रूपेश जाधव यांचे प्रास्ताविक आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचे शुभेच्छा मनोगत होणार आहे.
कोकण विभागातील शिक्षक समितीचे सर्व तालुकाध्यक्ष, सचिव, जिल्हाध्यक्ष, सचिव, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व सदस्यांनी शिबिराला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने, नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, पतपेढी संचालक नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे, जिल्हा पदाधिकारी आपा सावंत आदी उपस्थित होते.






