कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात

कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवारी, २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथील मराठा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष निखिल राजाराम ओरोसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या वार्षिक सभेत संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच आगामी आर्थिक वर्षासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. सभेच्या सुरुवातीला बैठकीची सूचना आणि विषयपत्रिका वाचन करण्यात आली असून, दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत मुलांना बक्षीस वितरण, तसेच निवृत्त सभासद आणि नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. मागील वार्षिक अधिमंडळ बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत निर्णय घेतला गेला. त्याचबरोबर ३१ मार्च २०२६ अखेरच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या अहवालाला, आर्थिक पत्रकांना आणि नफा-तोटा पत्रकाला मान्यता देण्याचा विषयही सभेच्या अजेंड्यावर होता. याशिवाय संचालक मंडळाने सुचविलेल्या नफा वाटणीस मान्यता, सन २०२५-२६ मधील अंदाजपत्रकीय अतिरिक्त खर्चाला तसेच सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, बाहेरील कर्जाची मर्यादा निश्चित करणे, हे विषयही सभेत मांडले गेले.
सन २०२५-२६ च्या लेखापरीक्षण अहवालातील शेऱ्यांची पूर्तता आणि सन २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालातील दोषपूर्तता अहवालाचे वाचन, तसेच सन २०२६-२७ साठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याबाबतही निर्णय घेतले.
तसेच कर्ज सुरक्षा विमा उतरविण्याबाबत विचारविनिमय, सभासदांकडून आलेल्या पत्रांचे वाचन आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या ३० जून २०२६ च्या परिपत्रकानुसार सुधारित आदर्श उपविधी स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण विषय देखील या सभेत मांडण्यात आला. त्यामुळे कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या ४१ व्या वार्षिक सभेत आर्थिक व्यवहार, नफा वाटप, कर्जव्यवस्था, लेखापरीक्षण आणि संस्थेच्या आगामी कामकाजाबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सभासदांचे लक्ष लागले होते.





