श्री कलेश्वर मंदिर परिसरात विकासाची नवी भर; जलशुद्धीकरण प्रकल्प लोकार्पित

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नेरूर येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन
कुडाळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्प आज कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पित करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून ग्रामविकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी अशा विकासकामांची आवश्यकता असून भविष्यातही जनतेच्या हितासाठी विविध विकास प्रकल्प राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामस्थांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या श्री कलेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेला हा प्रकल्प नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून ग्रामस्थांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.





