चक्रीवादळाने कणकवली तालुक्यात ५४ लाखाचे नुकसान

खारेपाटण परिसरात सर्वाधिक नुकसान
३६५ घरे, १४ शाळा आणि ५ गोठ्यांची हानी
कणकवली तालुक्यातील खारेपाटणसह अन्य गावांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यात ५४ लाख २२ हजार ५६६ रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे महसूल विभागाकडून सुरू झाले आहेत. काही प्रमाणात पंचनामे व्हायचे बाकी आहेत. यात सर्वाधिक नुकसान खारेपाटण परिसरातील घरांचे झाले आहे. चक्री वादळामध्ये ३६५ घरे १४ अंगणवाडी आणि शाळा तर पाच गोठ्यांची हानी झाली आहे. तर एक घराची पूर्ण हानी झाली आहे. चक्री वादळामध्ये खारेपाटण शहरातील १७९ घरांचे अंशतः तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले. याखेरीज चार गोठे, ५ पत्र्याच्या शेड आणि चार शाळांच्या छप्परांची हानी झाली आहे. कणकवली शहरात २ घरे, २ दुकाने आणि एक कापड दुकानचे पूर्णत: नुकसान झाले. हरकुळ बुद्रूकमध्ये २२ घरांचे अशंत: नुकसान झाले याखेरीज १ शाळा, १ अंगणवाडीचे नुकसान झाले. नागवे गावात २४ घरे, १ शाळा आणि १ अंगणवाडी, जानवलीत ४ घरे, १ गोठा, १ सुतारशाळा आणि १ अंगणवाडीचे अंशत: नुकसान झाले. साकेडी गावात २ घरे आणि १ गोठ्याचे, डामरे आणि कोंडये गावात १ घर, दारूम गावात ३ घरे, नडगिवे गावात २ घरे, वायंगणी गावात २३ घरे, १ गोठा आणि १ शाळा, चिंचवली गावात २५ घरे, १ गोठा, १ पोल्ट्री आणि १ घरांचे अंशत: नुकसान झाले.
कुरंगवणे गावात ३ घरे, १ गोठा, वारगावमध्ये ४ घरे, उत्तर दक्षिण गावठाण मध्ये १ शाळा, उत्तमनगरमध्ये २० घरे, श्रीनगर, पिंपळेश्वर, लिंगेश्वर गावात प्रत्येक १ घर, राजनगरमध्ये ७ घरे तर दारिस्ते गावात ४ घरांचे अशंत: नुकसान झाले आहे. शिवडाव गावात ६ घरे, १ गोठा, १ आश्रम आणि करंजे गावात २६ घरे, १ गोठा, १ समाजमंदिर आणि ३ शाळांची अंशत: हानी झाली आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडून या पंचनाम्यांचा आढावा घेण्यात येत आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





