कुडाळमध्ये दिवसाढवळ्या ५ फ्लॅट फोडले

भरवस्तीतील ‘गुरुप्रसाद’ सोसायटीत धाडसी चोरी

शहरात आज दुपारी भरवस्तीत घरफोडीची एक अत्यंत धाडसी घटना घडली आहे. शहरातील ‘गुरुप्रसाद गृहनिर्माण संस्था’ (सोसायटी) येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा पाच फ्लॅट फोडून चोरी केली. दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळमधील गजबजलेल्या भागात महामार्गानजीक असलेल्या गुरुप्रसाद सोसायटीमध्ये आज दुपारी चोरट्यांनी आपला हात साफ केला. नागरिक आपल्या कामात व्यस्त असताना आणि परिसरात वर्दळ असतानाही चोरट्यांनी पाच बंद घरांना लक्ष्य केले. घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मौल्यवान ऐवज लंपास केला. दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास जेव्हा काही रहिवासी घरी आले किंवा शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा चोरीचा हा प्रकार समोर आला.
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे. या चोरीत नेमका किती मुद्देमाल लंपास झाला आहे, याची माहिती अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही.

error: Content is protected !!