श्री देव कुणकेश्वर येथे हापूस आंब्यांची आकर्षक आरास; भाविक मंत्रमुग्ध

देवगड हापूसची अनोखी आरास; कुणकेश्वरात उत्सवी वातावरण
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे आयोजित आंबा महोत्सवाला भाविक व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महोत्सवानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच सभा मंडपात देवगड हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. हजारो हापूस आंब्यांनी सजविलेल्या मंदिर परिसरात दरवळणाऱ्या आंब्याच्या सुगंधाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यटकांपर्यंत अस्सल देवगड हापूस पोहोचवणे तसेच देवगड हापूसच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखणे हा होता. महोत्सवासाठी देवस्थान ट्रस्टमार्फत दहा स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते.
या स्टॉलमध्ये पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील हापूस आंबा तसेच आंब्यापासून तयार केलेले विविध पदार्थ विक्रीस ठेवले होते. आंबा पोळी, आंबा वडी, आंबा पल्प, आंबा शेक आणि अन्य फळ प्रक्रिया उत्पादनांना पर्यटकांकडून मोठी पसंती मिळाली. त्यामुळे स्थानिक शेतकरी व विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
विशेष आकर्षण ठरलेल्या या आरासमध्ये मायाझाकी या प्रसिद्ध विदेशी आंबा प्रजातीचाही समावेश करण्यात आला होता. मंदिर परिसरातील देखणी सजावट आणि आंबा महोत्सवामुळे कुणकेश्वर येथे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.





