सांगिर्डेवाडी कचरा डेपोला पुन्हा आग!

आठ दिवसांत दुसरी घटना; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नगरपंचायत व MIDC अग्निशमन दलाची धाव; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
कुडाळ तालुक्यातील सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला बुधवारी पुन्हा आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायत तसेच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
विशेष म्हणजे, अवघ्या आठ ते दहा दिवसांपूर्वी याच कचरा डेपोला आग लागण्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर आमदार निलेश राणे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. तसेच आग लागण्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या होत्या. तरीही पुन्हा त्याच ठिकाणी आग लागल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील ओला व सुका कचरा सांगिर्डेवाडी येथील मोकळ्या खासगी जागेत टाकला जातो. शहरातून कचरा गोळा करताना ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात असला, तरी डेपोवर मात्र तो एकत्र टाकला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
सुदैवाने या परिसरात कोणतीही वस्ती नसल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवली.
दरम्यान, कचरा डेपोबाबत नगरपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच डेपोस्थळी कायमस्वरूपी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करून देखरेख ठेवावी, अशीही मागणी स्थानिकांनी केली आहे.





