सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल तुटवडा; पंपांवर वाहनांच्या लांब रांगा!

मिरज डेपोतून टँकर उशिराने; अनेक पेट्रोल पंप बंद
लग्नसराई, उन्हाळी हंगामामुळे इंधनाची मागणी वाढली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत असून अनेक पेट्रोल पंपांवर ‘साठा उपलब्ध नाही’ असे फलक लावण्यात आले आहेत. मिरज डेपोतून येणारे टँकर उशिराने पोहोचत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज 15 ते 16 टँकर जिल्ह्यात येतात, मात्र सध्या 5 ते 7 तास उशिर होत असल्याने साठा संपत आहे.
उन्हाळी हंगाम, लग्नसराई आणि चाकरमान्यांच्या आगमनामुळे इंधनाची मागणी वाढली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सावंतवाडीतील अनेक पेट्रोल पंप बुधवारी बंद होते. जिल्हा पेट्रोल पंप मालक असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भाट यांनी तुटवडा नसून टँकर उशिराने येत असल्याचे सांगितले. गुरुवारपासून पुरेसा साठा उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या शक्यतेमुळे पुरवठा मुद्दाम उशिराने होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.





