शंकर महादेव विद्यालयाच्या स्नेहल राणे यांना उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार

शंकर महादेव विद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून देण्यात आला पुरस्कार
“मराठी भाषा गौरव दिनाचे” औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने जिल्ह्यातील मराठी अध्यापकांना देण्यात येणारे उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कणकवली तालुक्यातील शंकर महादेव विद्यालयाच्या स्नेहल सागर राणे यांना देखील उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार देण्यात आला. यावर्षीचा जिल्हा स्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार केळुस येथील स. का. पाटील विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शैलेश शांताराम तांबे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका मराठी अध्यापकाला एक असे आठ तालुकास्तरीय माय मराठी सेवा जिल्हा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण पुस्तक दिनाचे औचित्य साधून नुकतेच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथे मराठी भाषेचे तज्ञ शिक्षक श्रीकांत नाईक (गडहिंग्लज) आदी मान्यवरांच्याहस्ते वितरण केले गेले
यावेळी जाहीर करण्यात आलेले तालुकास्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार पुढीलप्रमाणे सावंतवाडी – मयुरी मंगेश कदम कळसूलकर हायस्कूल (सावंतवाडी), कुडाळ – आनंद कदम माणगाव हायस्कूल (माणगाव), दोडामार्ग – सागर लक्ष्मण डेगवेकर सरस्वती विद्या मंदिर (कुडासे), वेंगुर्ला – विजय ठाकर अणसुरपाल हायस्कूल (अणसुरपाल), कणकवली – स्नेहल सागर राणे शंकर महादेव विद्यालय (कुंभवडे), मालवण – महेश आत्माराम धामापूरकर अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल (मालवण), वैभववाडी – सत्तापा कृष्णा पाटील यशवंतराव चव्हाण विद्यालय (आचिर्णे), देवगड – बाळासाहेब वामन ढेरे कुणकेश्वर हायस्कूल (कुणकेश्वर)
शिक्षक शैलेश तांबे गेली २४ वर्षे ते मराठी विषयाचे अध्यापन करत असून त्यांचा निकाल शंभर टक्के वक्तृत्व, निबंध, व भाषा कौशल्य याबाबत सतत ,ते मार्गदर्शन करत असतात त्याचप्रमाणे ग्रंथालय चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभागी असून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शाळा शाळांमध्ये मार्गदर्शन करतात. उत्तम निवेदक असलेल्या शैलेश तांबे त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याबद्दल अनेक संस्थानी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. मराठी विषयाचे अध्ययन व अध्यापन करत असताना मराठी भाषेबाबतची जाणीव व जागृती ते सतत करत असतात. मराठी भाषेसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
गेल्या २१ वर्षांपासून मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या संवर्धनासह प्रसार व प्रचारासाठी उल्लेखनीय योगदान दिलेल्या मराठी अध्यापकांना माध्यमिक अध्यापक संघातर्फे उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, व ग्रंथ भेट असे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे, पुरस्कार निवड समिती प्रमुख पांडुरंग सामंत, सर्व मराठी अध्यापक संघ प्रतिनिधि उपस्थित होते.





