फोंडाघाट हवेलीनगर येथील रमेश विठ्ठल भोगटे यांचे निधन

फोंडाघाट परिसरातील एक ज्येष्ठ, मनमिळावू आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. हवेलीनगर, फोंडाघाट हवेलीनगर येथील रहिवासी रमेश विठ्ठल भोगटे यांचे बुधवारी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी फोंडाघाट येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश भोगटे हे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत होते. शिक्षण क्षेत्राबरोबरच ते प्रतिष्ठित किराणा मालाचे घाऊक व्यापारी म्हणूनही परिचित होते. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. साई मंदिराचे सचिव म्हणून त्यांनी निस्वार्थ भावनेने सेवा बजावली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे माजी संचालक म्हणून त्यांनी संस्थेच्या विकासात मोलाची भूमिका निभावली.
याशिवाय, बालगोपाल मित्रमंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राधाकृष्ण मित्रमंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी समाजकार्याची परंपरा जपली. त्यांच्या सौम्य स्वभावाने, कार्यतत्परतेने आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाने त्यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने फोंडाघाटसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून भाऊं बहीण आणि नातवंडे असा परिवार आहें.

error: Content is protected !!