संदिप परब यांचा जीवन संघर्ष प्रेरणादायी.……. डॉक्टर व्ही. व्ही दळवी, सहयोगी अधिष्ठाता, उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे

संविता आश्रमातील श्रमसंस्कार शिबिरात प्रतिपादन
संविता आश्रमात श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संचलित उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित तीन दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. दळवी यांनी, संदिप परब यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून, सातत्याने संघर्षाला सामोरे जात त्यांनी अनेक अडचणींवर मात केली. विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. उईके यांनी अल्पावधीत शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी प्रा. डॉ. गुरव, संविता आश्रमचे देऊ सावंत, आशिष कांबळे तसेच शैलेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी संदिप परब यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करत प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन केले व “दिवसातून एकदा तरी आपल्या कुटुंबीयांना फोन करा,” असा मोलाचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. श्रमसंस्कार शिबिर पुढील तीन दिवस चालणार असून या कालावधीत स्वच्छता मोहीम, सामाजिक जनजागृती, सेवा उपक्रम तसेच विविध विधायक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.





