कलमठ येथे हयात दाखला शिबिरामध्ये ७० लाभार्थ्यांना हयातीच्या दाखल्यांचे वितरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियान अंतर्गत आयोजन
ग्रामपंचायत कलमठ व ग्राम महसूल कार्यालयचे आयोजन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या सुशासन युक्त प्रशासन संकल्प अंतर्गत कलमठ गावातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत कलमठ आणि ग्राम महसूल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हयात दाखल्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजना लाभार्थ्यांना हयात दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
कलमठ ग्रामपंचायतच्या श्री देव काशी कलेश्वर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये ७० लाभार्थ्यांनी उपस्थित राहून हयात दाखला शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी बोलताना सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले गावातील सर्व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे दाखले सहजतेने उपलब्ध व्हावेत यासाठी कलमठ ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील असते आणि प्रत्येक योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक दाखल्यांसाठी ग्रामपंचायत अशा शिबिरांचे आयोजन करते, त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हयात दाखला शिबिर कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाचे शुभारंभ सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्राम महसूल अधिकारी सौ. गोजिरी गोडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, माजी उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वाती नारकर, नितीन पवार, अनु वारंग, श्रेयस चिंदरकर, कोतवाल उत्तम अडुळकर आणि मोठ्या लाभार्थी संख्येने उपस्थित होते.





