कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

कर्तृत्ववान महिलांचा ‘हिरकणी सन्मानपत्र’ देऊन गौरव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नाभिक महामंडळ व कणकवली तालुका नाभिक संघटना (महिला आघाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. कणकवली येथील नाभिक नेते अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी आपल्या कठोर परिश्रमाने आणि निष्ठेने समाजात प्रेरणा देणाऱ्या उपस्थित सर्व महिलांना व ‘सावित्रीच्या लेकींना’ संघटनेच्या वतीने ‘हिरकणी सन्मानपत्र’ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, अस्मिता अनिल अणावकर, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल, जिल्हा सदस्या (खजिनदार) शिवानी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच रचना चव्हाण, भक्ती चव्हाण, नंदा चव्हाण, प्रतिक्षा चव्हाण, पूनम चव्हाण, मैथिली चव्हाण, सहसचिव ईश्वरी कुबल, निशा चव्हाण, चिन्मयी चव्हाण, स्वानंदी कुबल यांसह संघटनेचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी चिमुकल्या स्वानंदी प्रवीण कुबल हिने ‘साऊ पेटती मशाल’ हे काव्य साभिनय सादर केले. तिच्या या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि सर्वांनी तिचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी केले. महिलांच्या सन्मानाने आणि उत्साही वातावरणात हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.





