महामार्गावर उभ्या कारला दुचाकीची धडक ; चालक गंभीर

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर दुचाकीने महामार्गावर उभ्या असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. काल सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार कुडाळहून आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी महामार्गालगत उभ्या असलेल्या इनोव्हा गाडीला दुचाकीची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुडाळ पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.





