ज्यांच्या निवडणुकीसाठी मदत केली त्यांनीही आमच्या निवडणुकीत पाठ फिरवली

ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उघड नाराजी
जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तत्कालीन विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी खासदार विनायक राऊतांवर नाराजांचा रोख
कणकवली तालुका शिवसेना ठाकरे गटाची आज झालेली बैठक वादळी ठरली. ज्यांच्यासाठी निवडणुकीत काम केले, मेहनत घेतली त्यांनीच आमच्या निवडणुकीत पाठ फिरवली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाचे नेते हे दूर राहिले. असे सांगत ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलेले व यापूर्वी अनेक बैठकांना राजीनामा दिल्यानंतरही उपस्थित राहणारे संदेश पारकर मात्र या बैठकीला अनुपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडणुकीत केलेले काम हे बोलून दाखवले. मात्र आमच्या निवडणुकीत जिल्हाप्रमुख म्हणून पारकर कुठे दिसले नाहीत अशी नाराजी देखील काहींनी व्यक्त केली. तर पक्षासाठी प्रामाणिकपणे कसे काम करायचे असे सांगणारे सतीश सावंत देखील निवडणुकीत आमच्या सोबत राहिले नाहीत. तर माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांच्या बाबतीत दाखवलेली उदासीनता ही मोठ्या नाराजीचे कारण ठरले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उमेदवारांना खर्चा करता अवघे 10 हजार रुपये देत जखमेवर मीठ चोळल्याचे देखील खाजगीत बोलून दाखवले. यावेळी जे येतील त्यांना सोबत घेऊन काम केले जाईल. जे येणार नाहीत त्यांच्या मागे लागले जाणार नाही. आहे त्यांना घेऊन पक्ष काम करेल असा इशारा देखील माजी आमदारांनी या बैठकीत दिल्याचे समजते. तर महिला जिल्हाप्रमुखांनी देखील पक्षाचे काम करायचे आहे ज्यांना करायचे असेल ते करतील असे सांगत कुणासाठी थांबायचं नाही असे संकेत दिले. मात्र कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची नेत्यांवर असलेल्या नाराजीचा उद्रेक या बैठकीत पाहायला मिळाला. त्यामुळे येत्या काळात ठाकरे शिवसेनेची मोट बांधताना ही मोट घट्ट होण्याऐवजी अजून ढिली होण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. त्यातच पक्षाच्या नेत्यांवर असलेली नाराजी आता उघडपणे व्यक्त केली जात असल्याने काही नेतेच बैठकांना गैरहजर राहत असल्याचे देखील या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून खाजगीत सांगितले जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





