पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार

कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत

बारामती येथील ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा करणार वापर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. बागायतदारांचे जवळपास ८५ टक्के नुकसान झाले आहे. सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्दच आहोत. ही मदत लवकरच जाहीर होईल. परंतू या हवामानाच्या बदलत्या संकटाला सामोरे कसे जावे? हापूसला विविध समस्यांतून मुक्त करताना कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ‘एडीटी’ (ADT) संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन केले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या हंगामात आंबा शेतकऱ्यांची नुकसानी हा विषय सिंधुदुर्ग जिल्ह्याची नुकसानी म्हणून तो आम्ही हाताळत आहोत. निश्चित पद्धतीने शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे.ती सगळ्या पद्धतीची मदत केली जाणार आहे, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
कणकवली प्रहार भवन येथे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यातील ३४,२९६ हेक्टर आंबा क्षेत्राला हवामान बदल, कीड आणि अनिश्चित फुलोरा या समस्यांचा विळखा बसला आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक झाडाचे निरीक्षण करणारी आणि दर ५०० मीटरवर अचूक हवामान देणारी प्रणाली विकसित केली जाणार आहे. यासाठी प्रति हेक्टर ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, साडेचार कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत दिला जाईल. एडीटी’संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भातील अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, “आंबा उत्पादक शेतकरी कधीही मदतीसाठी हात पसरत नाही, पण आज परिस्थिती गंभीर आहे. महायुती सरकार बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, पंचनामे झाले नसतील तर त्या क्षेत्राची माहिती तत्काळ द्यावी. राजकारण किंवा आंदोलनापेक्षा संवादातून मार्ग काढूया. माझे दरवाजे शेतकऱ्यांसाठी नेहमी उघडे आहेत.” यावेळी त्यांनी आंबा संशोधन केंद्राच्या ढिसाळ कारभारावरही ताशेरे ओढले.
तंत्रज्ञानाची ‘कवचकुंडले’
आंब्याच्या बागा वाचवण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. एआय आणि ड्रोन: प्रत्येक झाडाची प्रकृती आणि कीडरोगावर लक्ष ठेवणार, अचूक हवामान: दर ५०० मीटरवर हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा, लागवडीपासून काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर डिजिटल मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
पालकमंत्र्यांनी आंबा संशोधन केंद्राच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “संशोधन केंद्रातील अधिकारी माहिती पुरवण्यात कमी पडत आहेत. सरकार पगार देते, पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही, हा ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही,” असा सज्जड दम त्यांनी दिला.
‘राजकारण नको, शेतकऱ्यांचे हित पहा’
“आंदोलन किंवा मोर्चा काढणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, पण सध्या संकट जिल्ह्यावर आहे. आखाती देशांतील युद्धाचा येथील बाजारपेठेवरिल परिस्थितीचा परिणाम आपल्या आंबा शेतकऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण ‘सिंधुदुर्ग’ म्हणून गांभीर्याने हाताळावे लागेल. शासन म्हणून आम्ही मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकद लावू,” असे आश्वासन नितेश राणे यांनी केले.
आंबा-काजू यांसह कोकण मेव्याची काळजी घेणारी, त्या संदर्भात तातडीने मदत करणारी अद्ययावत लॅब सिंधुदुर्गात तयार करण्याची सुचना खा. नारायण राणे यांनी केली आहे. तशी अद्ययावत माहीती देणारी एआय तंत्रज्ञानयुक्त लॅब सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार करण्याबबात आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच ते मुर्त स्वरुपात येथील असा विश्वास पत्रकार परिषदेदरम्यान ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!