शिवजयंती उत्सव समिती च्या रॅलीमध्ये शेकडो दुचाकी हजारो शिवभक्त सामील

युवा नेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित रॅली

रॅलीमुळे कणकवलीचा परिसर बनला शिवमय

शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वरवडे ते कणकवली अशा काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी, चारचाकी रॅलीला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठा समाजाचे युवा नेते तथा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो शिवभक्त सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे या रॅलीमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते होतेच. मात्र सर्वधर्मीय, सर्वजातीय नागरिकांचा सहभाग, हे या रॅलीचे खास वैशिष्ट्य ठरले. महिला शिवभक्तांचा सहभागही उत्स्फूर्त होता. रॅलीमध्ये दुचाकींवर लावलेले भगवे झेंडे, भगव्या रंगाने सजविलेली वाहने, बालशिवाजीच्या वेशातील बच्चे कंपनी, शिवरायांच्या मावळ्यांचा पेहराव केलेले शिवभक्त, दुचाकीवरील कमानीत आसनस्‍थ झालेले बालशिवाजी अशा कित्येक बाबी लक्षणीय होत्या.
रॅलीचा प्रारंभ सामाजिक कार्यकर्ते कान्हा मालंडकर यांच्या हस्ते झाला. रॅलीत वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, माजी उपसरपंच आनंद घाडीगांवकर, कलमठ सरपंच संदीप मेस्‍त्री, माजी सरपंच निसार शेख, माजी उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, बिडवाडी माजी सरपंच सुदाम तेली, संजय साळसकर, संतोष उर्फ पप्पू पुजारे, यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वरवडे येथे प्रारंभ झालेली रॅली कलमठ बाजारपेठेत दाखल झाली. तेथे आयोजित शिवजयंती उत्सवातील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथे शिवजयंती उत्‍सव समिती कलमठ यांच्‍यातर्फे बाबू राऊळ यांनी शिवजयंती उत्‍सव समितीचे अध्‍यक्ष प्रताप भोसले व रॅलीचे स्‍वागत केले. त्यानंतर रॅली कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल झाली. तेथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवामध्ये माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, विद्यमान नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर रॅली बाजारपेठेच्या दिशेने रवाना झाली. पुढे शिवाजी महाराज नगर येथे शिवाजी महाराज नगर मित्रमंडळाच्या वतीने माजी नगरसेवक उमेश वाळके व अन्य नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. तेथे शिवाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे डॉ. विद्‍याधर तायशेटे यांनी रॅलीचे स्‍वागत केले. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीत काका कदम, इब्राहीम शेख, सुभाष मालंडकर, अमोल घाडीगांवकर, सोहेल खान, सुमंत सावंत, सिझर फर्नांडिस, बाळा बावकर, संदेश चिंदरकर, बाबजी चव्‍हाण, पुरुषोत्तम लाड, अनंत मगर, आनंद साटम, दिनेश सावंत, कुणाल देसाई, अभिजीत देसाई, आनंद बांदल, रुपेश नाडकर्णी, नीतेश पवार, प्रविण उर्फ बाळा सावंत, स्‍वरुप कोरगांवकर, समीर कदम, बंड्या मालंडकर, औदुंबर राणे, सागर राणे आदींसह जिल्‍हाभरातील शिवभक्‍त मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.
महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठीच रॅली : प्रताप भोसले
यावेळी पत्रकारांशी बोलताना शिवजयंती उत्‍सव समितीचे अध्‍यक्ष तथा युवा नेते प्रताप भोसले म्‍हणाले, छ. शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना घेऊन स्‍वराज्‍य निर्माण केले होते. महाराजांनी नेहमीच एकात्‍मतेचा संदेश दिला. हेच महाराजांचे विचार आम्‍ही रॅलीच्‍या माध्‍यमातून पुढे नेण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. म्‍हणूनच आमच्‍या रॅलीमध्‍ये सर्वपक्षीयच नव्‍हे तर सर्वजातीय, सर्वधर्मीय देखील सहभागी होतात. सामाजिक स्‍वास्‍थ्य टिकून रहावे, हाच रॅलीचा हेतू आहे. अर्थात याच हेतूने आम्‍ही ९ वर्षांपूर्वी रॅलीला प्रारंभ केला होता. पुढील वर्ष हे दहावे वर्ष असणार आहे. त्‍यावेळी आम्‍ही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणार आहोत. युवा पिढीने शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ यांचे फोटो, पुतळे डोक्‍यावर घेऊन नाचण्‍यापेक्षा त्‍यांचे विचार आत्‍मसात करावेत. त्‍यासाठी अभ्‍यास करा व महाराजांच्‍या विचारधारेवर चाला, असेही प्रताप भोसले म्‍हणाले.
मला समाजकारणातच राहूद्यात!
प्रताप भोसले हे गेल्‍या २० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषत शिवसंग्राम, संभाजी ब्रिगेड अशा राज्‍यस्‍तरीय संघटनांची जिल्‍हा स्‍तरावरील पदे त्‍यांनी भुषविली आहेत. येत्‍या काळात राजकारणात प्रवेश करणार का? असे विचारले असताना भोसले यांनी निर्मळ हसत ‘मला समाजाकारणातच राहूद्‍यात. महाराजांच्‍या जयंतीच्‍या निमित्ताने आता मला राजकारणात ओढू नका.’, अशी प्रतिक्रिया श्री. भोसले यांनी दिली.

error: Content is protected !!